BULDHANAHead linesVidharbha

आयुष्यात कधी एसटीही पाहिली नाही अन् ते विमानाने भुर्र उडाले!

– शिक्षकांची मेहनत व विद्यार्थ्यांची जीद्द फळाला!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – आई -वडिल हे जन्मदाते मात्र शिक्षक हेच मार्गदाते असतात. शिक्षकांच्या हातून शिकलेले मोठमोठ्या हुद्द्यावर गेले. मात्र तो आहे तेथेच मात्र समाधानी आहे. एकंदरीत शिक्षकांची मेहनत कधीच वाया जात नाही, मात्र विद्यार्थ्यांमध्येही जीद्द असाली लागते. असाच काहीसा सुखद अनुभव जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आला. तेथील विद्यार्थ्यांनी क्रीड़ा स्पर्धेत दमदार कामगिरी केल्याने १० ते १६ मार्चदरम्यान दिल्ली अभ्यास दौर्‍यासाठी निवड़ झाली असून, विविध ठिकाणी ते भेटी देत आहेत. विशेष म्हणजे, या गावात अजूनपर्यंत साधी एसटीही पोहोचली नाही, मात्र गरिबाघरचे हे आदिवासी विद्यार्थी चक्क विमानाने भुर्र उडून देशाच्या राजधानी नवी दिल्लीत गेले आहेत.

जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा हे मध्यप्रदेश सिमेलगत वसलेले आदिवासीबहुल गाव. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंत शाळा. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या गावाला रस्ता, वीज लाभली नाही. विकासापासून कोसो दूर असलेल्या या गावातील बोली भाषा हिंदी व भिलाली आहे. अशाही परिस्थितीत येथील शाळेचे मुख्याध्यापक हेमंत इंगळे व शिक्षक मेहनत घेतात. त्यामुळेच विद्यार्थी मुकेश ड़ावर, आकाश खटया, ज्योती खरात, मनिषा राऊत, संतोष सोळंकी, सीताराम सोळंकी, पूजा राऊत यांनी क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त कल्याने त्यांची राष्ट्रीय अविष्कार अभियान अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांच्या पुढाकाराने व शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, गटशिक्षणाधिकारी वामनराव फंड यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली अभ्यास दौर्‍यासाठी निवड़ झाली असून, त्यांनी आज ११ मार्चरोजी दिल्लीतील इंडिया गेट, इंदिरा गांधी स्मृतीस्थळ, बिर्ला मंदीर यासह महत्वाच्या ठिकाणी भेट देवून माहिती जाणून घेतली. एन. जे. फाळके व कु. अंजली नेटके हे अभ्यास दौरा सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख व चिखली तालुक्यातील सवणा येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीही या अभ्यास दौर्‍यात आहेत. या भागाचे आमदार ड़ॉ. संजय कुटे यांनी भिंगारा येथील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना घरी बोलावून सहृदय सत्कार केला. तसेच, काही पैसेही त्यांच्या गाठीशी दिले.


भिंगारा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशामुळे तालुक्याची मान उंचावली आहे. यामध्ये संबंधित शिक्षकांची मेहनत वाखाणण्याजोगी आहे. या भागाचे आ. ड़ॉ. संजय कुटे यांचे या शाळेकड़े विशेष लक्ष असते.
– वामनराव फंड़, गटशिक्षणाधिकारी पं.स., जळगाव जामोद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!