– दिवसभराच्या चौकशीनंतर बजावले समन्स; १३ मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावले असून, ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. ईडीच्या पथकाने आज सकाळीच मुश्रीफांच्या घरी छापा टाकला होता. मुश्रीफ हे घरी नसले तरी त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल साडेनऊ तास चौकशी करण्यात आली तसेच घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास मुश्रीफांच्या घराबाहेर हे पथक पडले.
ईडीने टाकलेल्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. ‘समाजासाठी हसन मुश्रीफ एवढे काम करत आहेत. पण, असे असले तरी ईडीकडून त्यांना त्रास देण्यात येत आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात. एकदाच आम्हाला गोळ्या घालून मारून टाका,’ अशी संतप्त प्रतिक्रिया सायरा मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच धाडीची माहिती मिळताच हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी घरासमोर मोठी गर्दी केली केली होती. यावेळी ईडी आणि किरीट सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, आज सलग तिसर्यांदा ईडीकडून ही छापेमारी झाली. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी सकाळी ७ वाजता दाखल झाले होते. मात्र हसन मुश्रीफ हे घरी नव्हते, दीड महिन्यामध्ये झालेली ही तिसरी कारवाई आहे. आज झालेल्या ईडीच्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून ४ वाजून ३५ मिनिटांनी बाहेर पडले.
दिवसभराच्या चौकशीनंतर हसन मुश्रीफ यांना येत्या सोमवारी म्हणजेच १३ मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे या समन्सनंतर मुश्रीफ चौकशीला सामोरे जातात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, हसन मुश्रीफ यांना याआधीदेखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. आजच्या छापेमारीदरम्यान मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते.
—————-