– पक्षातील अंतर्गत धुसफूस मिटवण्यात संपर्कप्रमुख प्रतापराव जाधवांना यश
बुलढाणा (प्रशांत खंडारे) : ‘ब्रेकिंग महाराष्ट्रने’ बुलढाण्यात शिंदे गटाला मोठा हादरा असल्याची बातमी सर्वप्रथम राज्यभर प्रसिद्ध केल्यानंतर तथाकथित राजीनामा देणार्यांपैकी अनेकांनी घुमजाव केले असून, सदर राजीनाम्याशी आमचा काही संबंध नसल्याचे काही पदाधिकारी म्हणत आहेत. शिवाय, त्यांनी खासदार प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. या भेटीमध्ये काय शिजले? ते माहित नाही. परंतु तळ्यात- मळ्यात करणारे हे पदाधिकारी निसंदिग्धपणे खा. जाधवांना ‘भाऊ, आम्ही तुमच्याच सोबत असल्याचे म्हणाले’. त्यामुळे तूर्त तरी पेल्यातील हे वादळ शमले असावे, असा सुटकेचा नि:श्वास राजकीय वर्तुळातून टाकला जात आहे.
जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात नवीन चेहर्याला तालुकाप्रमुख पदी नियुक्ती देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील शिवसेनेत अस्वस्थता निर्माण होऊन, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, खामगाव तालुकाप्रमुख सुरेश वावगे, युवासेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे, शहराध्यक्ष रमेश भट्टड यांच्यासह १७ पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे दिल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याबाबत हाती लागलेले पत्र व सविस्तर बातमी ब्रेकिंग महाराष्ट्रने प्रसारित केल्यानंतर खळबळ उडाली होती.
दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांची या वृत्तासंदर्भातील प्रतिक्रिया सहज होती. अद्याप कुणाचे फोन किंवा राजीनामाबाबत निवेदन आले नसल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. त्यांचीही प्रतिक्रिया ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केली आहे. मात्र संध्याकाळी हे राजीनामा प्रकरण निवळले आहे. खासदारांनी राजीनामा देणार्या काही पदाधिकार्यांची समजूत काढली असावी, अशी शक्यता निर्माण झाली आहे. यातील काही पदाधिकार्यांनी म्हटले की, त्या राजीनामा पत्राशी आमचा संबंध नाही. हे पदाधिकारी १० मार्चरोजी खा. जाधव यांना भेटण्यासाठी मेहकर येथे गेले होते. सदर तथाकथित राजीनामा पत्राशी आमचा काहीही संबंध नाही व आम्ही सर्व आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी खा. प्रतापराव जाधव यांनी सर्व पदाधिकारी यांना जोमाने काम करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी आमदार शशिकांत खेडेकर, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, शहर प्रमुख रमेश (बाबू) भट्टड, युवासेना उपजिल्हा प्रमुख नीलेश देवताळु, युवासेना तालुका प्रमुख राजू बघे, उपतालुका प्रमुख गोपाल भिल्ल, बंडू चिकटे, युवासेना उपशहर प्रमुख चेतन गायकवाड, युवासेना विभाग प्रमुख विष्णू काळे आदि पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील खामगावमधले राजीनामा प्रकरण तूर्त निवळले असल्याचे अधोरेखीत होत आहे.
—————–