BULDHANAVidharbha

खरे संत कोण? ज्ञानेश्वर की भागेश्वर? यावर व्याख्यान

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवर्तक प्रा.श्याम मानव यांचे वैचारिक वादळ बुलढाण्यात उठणार आहे. राज्यसह देशातील भोंदू बुवा बाबांचे कर्दनकाळ म्हणून प्रा.शाम मानव परिचित आहेत. दीर्घ काळानंतर बुलढाणा येथे त्यांचे सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखेने दिली आहे. शनिवार, ११ मार्च रोजी याबाबत नियोजन बैठक स्थानिक विश्राम भवन येथे पार पडली.

देशात कधी नव्हे असा अंधश्रद्धांना धोकादायक पाठिंबा दिला जात आहे. विवेकाची काजळी झडावी मात्र अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे. ढोंगी बुवा बाबांना संत समजल्या जात आहे. खर्‍या संतांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला. संतांनी मानवतावादाचा पुरस्कार केला. त्यामुळे आज खरे संत कोण ? ज्ञानेश्वर की भागेश्वर- तुकाराम की आसाराम? यावर प्रकाश टाकण्यासाठी प्राध्यापक श्याम मानवाच्या विदर्भात ११ सभांचे आयोजन राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आले आहे. यातील एक सभा बुलढाणा येथे २७ एप्रिल रोजी संध्याकाळी श्री शिवाजी विद्यालय येथे होत आहे.

आमचा देवा धर्माला विरोध नाही – तुपकर

आमचा देवाधर्माला विरोध नाही पण देवा धर्माच्या नावावर ढोंग व शोषण करणार्‍या प्रवृत्ती विरुद्ध आमच्या लढा आहे, असे प्रतिपादन यावेळी अंनिसचे पदाधिकारी व मराठा सेवा संघाचे डॉ. मनोहर तुपकर यांनी केले. ही सभा वैचारिक मंथन असल्याचे डॉ. तुपकर म्हणाले. धीरेंद्र महाराजांचा दिव्य दरबार, बाबा बुवा अंनिसचे आव्हान का स्वीकारत नाही, अशा लोकांवर कारवाई का होत नाही? यावर प्राध्यापक श्याम मानव परखड भाष्य करणार आहे.

छत्रपती संभाजी राजांना अभिवादन

छत्रपती संभाजी राजे बलिदान दिनाचे औचित्य साधून यावेळी मान्यवरांनी राजांना अभिवादन केले. छत्रपती संभाजी राजांचे कार्य इतिहासाच्या कसोटीवर उतरणारे असल्याचे प्रमोद टाले म्हणाले. टाले यांच्या प्रयत्नातून बुलढाणा येथे मराठा इतिहास संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमास डॉ मनोहर तुपकर, प्रमोद टाले, दत्ताभाऊ शिरसाठ, पत्रकार गणेश निकम, भीमसेन शिराळे, संजय विखे, संजय खांडवे, सुनील सपकाळ, उत्तमराव बाजड, सुमित जाधव, जगन बाजड, आशिष गवई, मुख्याध्यापक रामेश्वर तायडे, प्रा गोपालसिंग राजपूत, गजानन पडोळ, सतीश पाटील, राम सोनवणे, विवेक हिवाळे, प्रा माणिकराव गवई, रितेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राम सोनवणे यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!