बीबी (प्रतिनिधी) – रविकांत तुपकर यांच्या आत्मदहन आंदोलनादरम्यान पत्रकारांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा व धक्काबुक्कीचा बीबी येथे पत्रकारांनी एकत्र निषेध व्यक्त केला. यावेळी ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.
बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २१ फेब्रुवारी रोजी शेतकरीहितांच्या मागण्यांकरिता आंदोलन केले असता, त्या ठिकाणी वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस प्रशासनाच्यावतीने धक्काबुक्की व त्यांच्यावर अमानुष लाठीहल्ला करण्यात आला. हा प्रकार निंदनीय असून पत्रकारांच्या पत्रकारिता पेशावर गदा आणणारा आहे. कुठेही घटना व घडामोडीचे वृत्तसंचालन करण्याकरिता पत्रकार जात असतात. बुलढाणा येथील पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाचे वृत्तसंकलन करण्याकरिता गेले असता, काही पत्रकारांना पोलीस प्रशासनाच्यावतीने धक्काबुक्की व लाठीचार्ज करीत अटकाव करण्यात आला. अशाप्रकारे पत्रकाराचा वृत्तसंकलनात बाधा निर्माण करणे व पत्रकारांना धक्काबुक्की लाठीचार्ज करणे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचे खच्चीकरण करण्याचाच प्रकार आहे, असे निवेदनात नमूद करून बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे यांना देण्यात आले आहे. यावेळी पत्रकार प्रदीप चव्हाण, भागवत आटोळे, रमेश खंडागळे, काशिनाथ राऊत, सोरमारे मामा, संतोष भाऊ गुलमोहर, देवानंद सानप, राम जाधव, दिनकर काकड, ब्रह्मानंद वाकोडे, ऋषी दंदाले व इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.