– आ. सौ. श्वेताताई महाले यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली – जिल्हाधिकारी डॉ. पी. एच. तुम्मोड
उदयनगर, ता. चिखली (विनोद खोलगडे) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग, महाराष्ट्र शासन आणि चिखलीच्या आमदार श्रीमती श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा यांच्यावतीने आज, ता.१६ फेब्रुवारीरोजी स्व. दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तोरणवाडा रोड, उदयनगर (उंद्री) येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याला बेरोजगार युवक व युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विशेष बाब म्हणजे, ९५० जणांनी नोंदणी केली होती. यापैकी ४६५ युवक-युवतींना ऑन दी स्पॉट नोकरी मिळाली. या युवक-युवतींनी आ. महाले यांचे आभार व्यक्त केले आहेत.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. पी. एच. तुम्मोड म्हणाले, की आजची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. पूर्वी मॅट्रिक झाला की नोकरी लागायची. परंतु आता मोठमोठ्या पदव्या घेऊनही नोकरी मिळत नाही. शिक्षण घेऊन युवक बाहेर पडत आहे पण रोजगार मिळत नाही. परंतु कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग, महाराष्ट्र शासन आणि आमदार श्रीमती श्वेताताई महाले, चिखली मतदार संघ यांच्यावतीने युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने या संधीचे सोने करून चांगली ऑफर असेल तर जिल्ह्याबाहेरसुद्धा बेरोजगारांनी जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.तुम्मोड यांनी या महारोजगार मेळाव्यात बेरोजगार युवक-युवतींना मार्गदर्शन करतांना केले.
तर, प्रचंड बेरोजगारी वाढलेली असताना आणि बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची गरज असताना उद्योजक, कंपन्या या अनुभवी काम करणारे मनुष्यबळ मिळाले पाहिजे असा आग्रह धरतात. प्रत्येक हाताला काम दिल्यानंतरच त्यांना कामाचा अनुभव येईल . त्यासाठी आधी काम दिले पाहिजे. काम देणारच नसाल तर अनुभव कुठून येईल? असा सवाल करीत विना अनुभव हाताला काम देऊन अनुभवी माणसे घडविण्याचे आवाहन आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांनी या महारोजगार मेळाव्याच्या उद्धाटनपर संबोधित करताना केले. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या उस्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या रोजगार मेळाव्याला संबोधित करताना आ. सौ. श्वेता ताई महाले पाटील म्हणाल्या की, चिखली शहर हे औद्योगिक शहर म्हणून उदयास येत आहे. शहरातील एमआयडीसी ही आता जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी बनलेली आहे. अनेक उद्योजकानी याठिकाणी उद्योग उभारण्यासाठी जागेची मोठी मागणी केलेली आहे. जागा नसल्याने नव्या उद्योग उभारणी होत नाही. चिखली एमआयडीसीमध्ये जागा वाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याचेही त्या म्हणाल्यात.
महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ आ. सौ. श्वेताताई महाले पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ एच पी तूम्मोड यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष चिखली संतोष काळे, नवलसिंह राजपुत यांची समायोचीत भाषणे झाली. प्रास्ताविक कौशल्य विकास सहाआयुक्त प्रांजली बारास्कर यांनी केले. आभार प्रदर्शन युवा मोर्चा बुलडाणा तालुका अध्यक्ष योगेश राजपुत यांनी केले. यावेळी मंचावर तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी बचाटे, प्राचार्य गंगावणे चिखली, प्राचार्य खुळे खामगाव, स्वर्गीय दयासागर महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गडाम होते. यावेळी डॉ कृष्णकुमार सपकाळ, अॅड सुनील देशमुख भाजपा तालुका अध्यक्ष, संजय महाले, विष्णू वाघ, दिगंबर राऊत, जितेंद्र कलंत्री, महादेव ठाकरे, अंकुशराव तायडे, शाहिद पटेल, गजानन दुधाले, अनिल अंभोरे, गणेश काळे, गजानन काळे, भीमराव अंभोरे, शिवनारायण नखोत, अनिल सपकाळ, काशिनाथ मोरे, सचिन गारद, रामेश्वर राठोड, गणेश यांगड, विठ्ठल क्षिरसागर, अशोक लाहुडकर आदी उपस्थित होते.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास १६ पेक्षा अधिक कंपन्या व उद्योजकांनी त्यांच्याकडील ११७८ पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित केलेली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याद्वारे टाटा, महिंद्रा, हिताची सारख्या नामांकित कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून त्यांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधीसुध्दा निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. टाटा सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध झाले होते.