Uncategorized

‘एलसीबी’चा मलकापुरात छापा; घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – मलकापूर शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या घरगुती गॅसच्या काळ्या बाजाराचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) टाकलेल्या छाप्यांत पर्दाफास झाला. एलसीबीच्या पथकाने १४ फेब्रुवारीरोजी मलकापूर येथील देवधाबा रोडवर टाकलेल्या छाप्यांत हा काळाबाजार उघडकीस आला असून, गॅस सिलिंडरसह ५ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत आरोपी प्रकाश दादाराव आढाव, रा. रोहिदास नगर मलकापूर आणि अन्य चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरगुती गॅसचा अवैध वापर व वाहनांत चढ्यादराने भरण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मलकापूर शहर व परिसरात याबाबतचे रॅकेटच सक्रीय आहे. याबाबतची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली असता, या पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने १४ फेब्रुवारीरोजी पोलीस स्टेशन मलकापूर शहर हद्दीत छापा टाकण्यात आला.

यावेळी आरोपी प्रकाश दादाराव आढाव रा. रोहिदास नगर मलकापूर आणि अन्य चार आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. या आरोपींकडून ३ ऑटो, एक होंडा सिटी कार, मोटार कॉम्प्रेसर नळी नोझल, इलेस्ट्रीक काटा असा एकूण ५ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींविरुद्ध कलम २८५, २८६ भादविंसह कलम ३, ७ तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार (ईसी) कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई बुलडाणा गुन्हे शाखेच्या पथकातील एपीआय विलासकुमार सानप, एएसआय रामविजय राजपूत, राजकुमार राजपूूत, गजानन दराडे, गणेश पाटील, विजय वारुळे, गजानन गोरले, गणेश शेळके, चालक मधुकर रगड यांनी केली. या कारवाईने गॅसचा काळाबाजार करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!