Breaking newsHead linesMaharashtra

रस्ता ओलांडणार्‍या महिलांच्या घोळक्याला कारने चिरडले, पाचजणी जागीच ठार

नाशिक (जिल्हा प्रतिनिधी) – पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर जवळच्या शिरोली परिसरात खरपुडी फाट्याजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात घडला. भरधाव जाणार्‍या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणार्‍या महिलांच्या घोळक्याला चिरडले. पुणे बाजूकडून नाशिककडे जाणार्‍या लेनवर रात्री ११ वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या अपघातात ५ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, १३ महिला जखमी झाल्या आहेत. या घोळक्यात १८ महिला होत्या, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या भयंकर घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

या सर्व महिला अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या. मध्यरात्री काम संपल्यानंतर त्या पुण्याकडून येणार्‍या बसमधून खरपुडी फाटा येथे उतरल्या. पश्चिम बाजूकडून पूर्वेकडे रस्ता ओलांडत असताना या महिलांच्या घोळक्याला पुण्याकडून वेगात येणार्‍या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यातील तीन ते चार महिला फुटबॉलसारख्या हवेत उडाल्या. या भीषण अपघातात ५ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर १३ महिला गंभीर जखमी झाल्या. या सर्व अपघातग्रस्त महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून, या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रात्री अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडा-ओरडा झाला, यावेळी याच परिसरातून पोलिस उपनिरीक्षक जात असताना त्यांनी पोलिस व प्रशासकीय यंत्रणाशी तातडीने संपर्क करुन जखमी महिलांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले.


अपघातानंतर आमच्या साथीदार महिला रस्त्यावर पडल्या होत्या, आम्ही जोरजोरात रडत होतो. मदत मिळावी यासाठी ओरडत होतो. १० ते २० मिनिटं आम्हाला मदत मिळाली नाही. थोड्या वेळानंतर आम्हाला मदत मिळाली. रस्त्यावरून येणार्‍या-जाणार्‍या वाहनचालकांनी गाड्या थांबवल्या. त्यानंतर जखमी झालेल्या महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर पोलिसांनी आम्हाला खूपच धीर दिला. त्यांनी आमचे सांत्वन केले, आम्हाला पाणी दिले, घाबरू नका असा धीर दिला, असे प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितले.
————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!