कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरमध्ये लव्ह जिहाद, धर्मांतरण, आंतराजतीय विवाह आणि गो-हत्याविरोधात हिंदू समाजाकडून ‘जन-आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. हा मोर्चा बिंदू चौकातून प्रारंभ झाल्यानंतर मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी चौकमार्गे मोर्चा भवानी मंडप कमानीबाहेर आला. तेथे या मोर्चाचे रूपातंर विराट सभेत झाले. यावेळी सर्व समाजाने मोर्चावेळी दुकाने, व्यापार, उद्योग बंद ठेवून मोर्चात सहभाग होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आले होते.
आज सकाळी १० वाजता बिंदू चौक येथे महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून उपस्थित हिंदुत्ववादी नेत्यांचे हस्ते पुष्पहार घालण्यात आला, आणि मोर्चास प्रारंभ करण्यात आला. मोर्चामध्ये असंख्य हिंदुत्ववादी, सर्वपक्षीय नेते मंडळी आणि महिलावर्गाचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. हा मोर्चा बिंदू चौकातून जुना देवल क्लब, मिरजकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भवानी मंडप येथे मोर्चाची सांगता झाली. मोर्चा मार्गांवर थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, उपवासाचे लाडू असे खाद्यपदार्थ वाटप करण्यात येत होते. ठिकठिकाणी भगवे झेंडे, टोप्या, उपरणे, कपाळाला लावण्यात आलेल्या पट्या, अष्टगंध देखील वाटले जात होते.
मोर्चावेळी अंबाबाई मंदिर परिसराकडे जाणारा मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. मोर्चास होणार्या संभाव्य गर्दीमुळे पोलीस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केला होता. व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, दसरा चौक, १०० फुटी रस्ता, खानविलकर पेट्रोल पंप, शहाजी महाविद्यालय येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. दिल्ली येथील सुदर्शन चॅनलचे संस्थापक सुरेश चव्हाणके, खासदार धनंजय महाडिक, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, महेश जाधव, वकील सुधीर जोशी वंदुरकर, शांतिनाथ लिंबानी, अनिरुद्ध कोल्हापुरे, केशव गोवेकर, शिवानंद स्वामी, विजय देवणे, संजय पवार, सुनील मोदी यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
—————–