आळंदी ज्ञानेश्वर विद्यालयात ‘नाद करायचा नाय’ स्नेहसंमेलनाची सांगता!
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘नाद करायचा नाय’ स्नेहसंमेलनाची सांगता विविध उपक्रमांनी उत्साहात झाली. यात ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयास आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेने (International Organizations Of Standardization) दिलेल्या ३३ मुद्यांची पूर्तता करून आय.एस.ओ. नामांकनास पात्र ठरले. या निमित्ताने उपस्थित मान्यवरांसह आळंदीचे प्रभारी मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्याहस्ते नामांकन प्रमाणपत्र प्राचार्य दीपक मुंगसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उमेश महाराज बागडे, आय.एस.ओ.चे अग्रणी परीक्षक सुभाष चौधरी, विशेष आकर्षण ज्याने आपल्या वयाच्या ९ व्या वर्षात तबला वादन करणारा व रियालिटी शो मध्ये १६ प्रकारची ताल वाद्य वाजवणारा बालकलाकार झी युवा संगीत सम्राट फेमसोहम गोराणे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, सदस्य अनिल वडगावकर, संदेश पवार, माजी सभापती श्रीधर कुर्हाडे, माउली देवस्थानचे उप व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अनिल जोगदंड, हनुमंत चव्हाण, सय्यद सर, शाम गोराणे, बोरुले साहेब, कृष्णा व्यवहारे, वैष्णव चोपदार, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अजित वडगावकर यांनी विद्यालयाला आय.एस.ओ. नामांकन मिळण्यामागे संस्थेच्या सर्व घटकाचे योगदान असल्याचे सांगितले. सुभाष चौधरी यांनी विद्यालयास आय.एस.ओ. दर्जाचे नामांकन प्राप्त होणे म्हणजे संस्थेच्या भाग्याचा दिवस असून आपण आपली ही प्रतिमा अशीच सांभाळावी असे वक्तव्य करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी शिक्षण म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास जे माणसाला सुदृढ बनवते. असेच सुदृढ व्यक्ती या संस्थेतून घडावेत असे विचार मांडत संस्थेचे कार्य व भौतिक सुविधा प्रशंसनीय असल्याचे सांगत उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. उमेश बागडे यांनी प्रयत्नांचे सातत्य राखले तर मनुष्य जीवनात कधीही हारणार नाही यासाठी निरंतर प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.
विशेष आकर्षण सोहम गोराणे यांनी रेला, बंदिसी व चक्रधर या तीन तालामध्ये तबला वादन करून कृष्णा व्यवहारे यांच्याशी की बोर्ड बरोबर जुगलबंदी करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांनी कौतुक केले. शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून देशातील विविधता दर्शवत वेशभूषा, संस्कृती, विविध जाती – धर्म उत्सव इत्यादीचे दर्शन घडवले. तसेच चिमुकल्यांनी आयो रे मारो ढोलना राजस्थानी गीतावर नृत्य करून प्रेक्षकांना डोलायला भाग पाडले.