आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यास एक आदर्श व्यक्ती घडविण्याच्या उद्देशाने “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” एक संस्कारक्षम उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत दिले जाते. १ जानेवारी २०२१ पासून सुरू झालेल्या पर्वाची सांगता झाली.
या दरम्यान ज्ञानेश्वरी ग्रंथावर आधारित विद्यार्थ्यां करिता जो अभ्यासक्रम तयार केला त्यावर आधारित परीक्षा घेण्यात आली. ज्ञानेश्वरी ग्रंथातील १८ अध्यायांना अनुसरून १८ विद्यार्थ्यांचे नंबर काढण्यात आले.त्यांचा सन्मान वरुण भागवत (ज्ञानेश्वर माऊली मालिकेतील (सोनी टी. व्ही.) माऊली फेम) व अवधूत गांधी(ज्ञानेश्वर माऊली मालिकेतील (सोनी टी. व्ही.) संत नामदेव फेम) यांच्या हस्ते करण्यात आला. परीक्षेत पात्र ठरलेल्या पहिल्या २ विद्यार्थ्यांना नारायण गावडे (उद्योगपती) यांच्याकडून सायकल व सार्थ ज्ञानेश्वरी, ३ व ४ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्राजक्ता हरपळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वर्षभराचा सर्व शैक्षणिक खर्च कपड्यासह व सार्थ ज्ञानेश्वरी, ५ व ६ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रकाश काळे यांच्या वतीने दोन शालेय गणवेश, ७ ते ९ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्राजक्ता हरपळे यांच्याकडून स्कूल बॅग व सार्थ ज्ञानेश्वरी आणि १० ते १८ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सार्थ ज्ञानेश्वरी तसेच एकूण ११ उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना शिक्षिका हेमांगी कारंजकर यांच्या वतीने टिफीन डबा देऊन सन्मानित करण्यात आले. या १ ते १८ पात्र विद्यार्थ्यांना चरित्र समिती व श्रीधर घुंडरे यांच्यावतीने सार्थ ज्ञानेश्वरी देण्यात आली. त्याचप्रमाणे फक्त ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमासाठी दूरवरून येणाऱ्या १ विद्यार्थ्यास सायकल बक्षीस देण्यात आली.
वर्षभर विद्यार्थ्यांना दर रविवारी ज्ञानेश्वरीच्या पाठाला जीवन जगण्याची कला शिकवणाऱ्या प्राध्यापक ह.भ.प. भागवत महाराज साळुंके, ह.भ.प. उमेश महाराज बागडे, ह.भ.प. सुभाष महाराज गेटे व ह.भ.प. श्रीधर घुंडरे यांचा व दर रविवारी उपक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव, राजेश बादले (साहित्यीक), ॲड. विलास काटे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, सचिव अजित वडगांवकर, श्रीधर सरनाईक,सदस्य अनिल वडगांवकर, विठ्ठल शिंदे,आरिफ शेख, दिनेश कुऱ्हाडे, संस्थेचे व चरित्र समितीचे सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे आदी शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या वेशभूषेतील व वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा,टाळ मृदुंगाच्या व हरिनामाच्या गजरात स्वागत केले.
यावेळी प्रकाश काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये अजित वडगांवकर यांनी उपक्रमाचा उद्देश व त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला सकारात्मक बदल यामुळे संस्था व चरित्र समितीला लाभलेले समाधान हे खूप मोठे असल्याचे सांगितले. याप्रसंगी विलास काटे यांनी २२ दिवसाच्या पंढरपूर ते घुमान (पंजाब) पर्यंतच्या सायकल वारी दरम्यान आलेल्या अडचणी, मिळालेले सहकार्य याविषयी मत व्यक्त करत शांती, समता व एकता यांचा संदेश दिला. राजेश बादले यांनी अजोड साहित्याची ओळख म्हणजे ज्ञानेश्वरी तसेच अवधूत गांधी यांनी माऊलींचे चरित्र व चारित्र्य समाजापुढे यावे यासाठी सर्व बाजूंनी सर्व प्रकारचे प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगितले. तदनंतर वरूण भागवत यांनी माणसाला कलेची व शिक्षणाची भूक असावी व त्याचा विकास करणे तेवढेच गरजेचे आहे ते सांगितले. शेवटी नारायण महाराज जाधव यांनी ज्ञानोबारायाचे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांनी संक्रमित करण्याचं काम करावं असा संदेश दिला. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले. आभार प्राचार्य दीपक मुंगसे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता माऊलींच्या पसायदानाने झाली.