आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी कैलास केंद्रे यांची नियुक्ती झाली असून मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना बढती देण्यात आली असून, अद्याप नियुक्ती जाहीर करण्यात आली नाही. नवनियुक्त मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची सांगोला नगरपरिषद येथून आळंदीत बदली करण्यात आली आहे.
आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे काम करण्यास मोठा वाव आहे. येते येणाऱ्या भाविकांसह नागरिकांना नागरी सुविधा देण्याचे प्रभावी काम करताना तारेवरची कसरत करावी लागते. सर्वाना बरोबर घेऊन काम केल्यास काम करताना अडचणी येत नसल्याची बाब ओळखून तत्कालीन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी आळंदीत काम केले. त्यांचे कार्यकाळात भामा आसखेडचे पाणी आळंदीत बंधिस्त पाईप लाईनद्वारे देण्याचे लक्षवेधी कार्य झाल्याने त्यांचे आळंदीत कौतूक झाले. आळंदी येथील सिद्धबेट विकास कामाचा मार्ग मोकळा झाला असून तीर्थक्षेत्र आळंदीचे वैभवात वाढ करणारा प्रकल्प करारबद्ध करून भाविकांना सेवासुविधा आळंदीत मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते विकासाचे काम, वडगाव पार्किंग जागेत विकास, हरिपाठ बालोद्यान, रस्त्याचे दुभाजकांत वृक्षारोपण, आळंदीतील मुख्य बाह्यवळण मार्गाला गती, रस्ते भूसंपादन, स्वच्छ, सुंदर हरित आळंदीला लक्षपूर्वक कामे हाती घेतली. याशिवाय येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या ( एस.टी.पी. ) जागेचे भूसंपादन अशी अनेक कामे करता आल्याचे बदली मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले. विविध सेवा भावी संस्थाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम, जनजागृती करीत स्वच्छ सुंदर आळंदी साठी सेवाभावी वृत्तीने काम केल्याने समाधान लाभल्याचे जाधव यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना आळंदी नगरपरीषद मधून पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे आळंदीत रुजू झाले आहेत. केंद्रे यांना मुख्याधिकारी सांगोला नगरपरीषद या सध्याच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची आळंदीत मुख्याधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यांचे पुढे आळंदीतील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्यासह येथील बाह्य वळण मार्गाची उर्वरित जागा ताब्यात घेण्यासा, वाहनतळ जागा, भाजी मंडई आरक्षित जागा,दररोज पाणी पुरवठा, शाळेच्या इमारतीची दुरावस्था, शाळा क्रमांक ४ ची इमारत बांधकाम, नगरपरिषद प्रशासकीय इमारत बांधकाम असे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान आहे. याशिवाय आळंदी नगरपरिषद दुसरी सुधारित विकास योजना यातील मंजूर आरक्षणे काल बाह्य होऊ नये यासाठी आरक्षित जागांचे भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवावे लागणार आहे. चाकण रोड वाहनतळ आरक्षण वगळण्यात आल्याने यास देण्यात आलेला पर्याय विकसित न झाल्याने मूळ वाहनतळ प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे. तीर्थक्षेत्र आळंदीत येणाऱ्या भाविकांना सेवा सुविधा देताना नागरिकांच्या सेवा सुविधांकडे देखील लक्ष द्यावे लागणार असल्याचे अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. सांगोल्या प्रमाणे आळंदीत देखील माझी वसुंधरा अभियान राबवून आळंदीला पहिल्या पाच मध्ये आणण्याचे शिवधनुष्य ते उचलणार का हे आता पाहावे लागणार आहे.