जिजाऊ जन्मोत्सवाचे उद्धव ठाकरे, अजित पवारांना निमंत्रण!
– मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासह १० ठराव परभणी येथील अधिवेशनात मंजूर
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी यंदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजितदादा पवार यांना लेखी निवेदन पाठवलेले आहे. त्यापैकी ठाकरे यांनी ‘येऊ’ म्हणून तोंडी कळवलेले आहे. परंतु, या दोघांकडून अद्यापही होकार आलेला नाही, अशी माहिती मराठा सेवा संघाच्या नेतृत्वाकडून मिळाली असून, १२ जानेवारीरोजीच्या जिजाऊ जन्मोत्सवाला उद्धव ठाकरे येतील की नाही, याबाबत अजून प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, मराठा सेवा संघाचा ओबीसी (इतर मागास प्रवर्ग)मध्ये समावेश करण्यात यावा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर महापुरूषांच्या बदनामीप्रकरणी राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, आदी १० ठराव परभणी येथील महाअधिवेशनात मंजूर झाले असल्याचेही या नेतृत्वाने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
सिंदखेडराजा येथील राजमाता जिजाऊ मॉसाहेबांच्या जन्मोत्सवाला उद्धव ठाकरे व अजित पवार या दोन नेत्यांनी यावे, यासाठी मराठा सेवा संघाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. चिखली येथील जाहीर सभेनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी जात भेट घेतली होती. यावेळीही खेडेकर यांनी ठाकरेंना जिजाऊ जन्मोत्सवाचे निमंत्रण दिले होते. तसेच, नंतरही मराठा सेवा संघाकडून ठाकरे व पवार यांना लेखी स्वरुपात निमंत्रण दिलेले आहे. परंतु, या दोन्ही नेत्यांकडून अद्याप तरी होकार आलेला नाही. यंदाच्या जन्मोत्सवाची जोरदार तयारी चालली असून, या जन्मोत्सवाला ठाकरे, पवार हे दोन्ही नेते निश्चितच येतील, असा विश्वास मराठा सेवा संघाला आहे.
——————–