सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्हा परिषद दलित वस्ती सुधारणा योजनेचे टेबल सध्या कोणाकडेही नाही. परंतु हे टेबल आता समाज कल्याण निरीक्षक स्वाती गायकवाड व वरिष्ठ सहाय्यक मोनिका हिरेमठ या दोन महिला कर्मचार्याकडे हे देण्याचे नियोजन सुरू आहे. परंतु दोन महिला कर्मचार्यांना हे टेबल सांभाळण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
दलित वस्ती सुधारणा योजनेच्या कामाचा मागील काही दिवसांपूर्वी मोठा गोंधळ उडाला होता. दलित वस्ती सुधारणा योजनेचे काम मिळावे, यासाठी जिल्ह्यातील नेते, सरपंच प्रयत्न करत असतात. त्यासाठी आमदार, खासदार, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य यांची मर्जी सांभाळून कामे द्यावी लागतात. यामधील एखाद्याने जरी नाराजी व्यक्त केली तर त्याचे पडसाद पुढे गोंधळामध्ये होणार हे निश्चित आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये दोन महिला असलेल्या कर्मचार्याकडे हे टेबल दिले तर चांगलेच आहे. परंतु त्यामध्ये एखादा पुरुष असेल तर जिल्हातून आलेल्या फोनला उत्तरे देता येऊ शकते. त्यासाठी लिपिक असलेले शशी ढेकळे यांना सोबत घेतले तर एक महिला व ढेकळे हे टेबल व्यवस्थित सांभाळू शकतील, असा सूर समाज कल्याण विभागांमधून निघत आहे. अन्यथा, अनेक वेळा महिलांमध्ये समन्वय नसल्यामुळे अडचणीचे होऊ शकते. मात्र समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर हे दलित वस्ती सुधारणा योजनेचे टेबल कोणाकडे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दलित वस्तीच्या तिजोरीमध्ये खडखडाट!
दलित वस्ती सुधारणा योजनेचे टेबल देण्याची नियोजन सध्या समाज कल्याण विभाग करीत आहे. परंतु सध्या या दलित वस्ती सुधारणा योजनेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. त्यामुळे योजना राबवायची कशी असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे राज्यातील नवीन सरकार आल्यापासून आतापर्यंत एक रुपयाचाही निधी नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दलित वस्तीचा विकास थांबला असल्याचे दिसत आहे.
——————–