BULDHANAHead linesVidharbha

छत्रपती संभाजीराजेंना ‘धर्मवीर’ म्हणून काही राजकीय नेत्यांकडून त्यांचे खच्चीकरण!

– राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या ‘सन्मान यात्रे’चा देऊळघाटात शानदार समारोप

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आजकाल राजकीय नेत्यांना धर्मवीर ही पदवी लावण्यात येते. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते असे म्हणून शिंदे गटातील आमदार स्वतःची तुलना त्यांच्यासमवेत करण्याचा कोविलवाणा प्रयत्न करीत आहे. यावर कळस म्हणजे, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हेदेखील स्वतःला धर्मवीर म्हणवून घेतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अमोल मिटकरी यांनी स्वराज्यरक्षक की धर्मवीर या वादावर भाष्य करताना भाजपसह शिंदे गटावर टीकास्त्र डागले.

देऊळघाट येथे गेल्या १७ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या ‘सन्मान यात्रेचा ‘ शानदार समारोप काल रात्री पार पडला .भाजपाच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतील यात्रेचा शानदार समारोप संपन्न झाला. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत आ. मिटकरी बोलत होते. वादग्रस्त विधाने करणार्‍या शिंदे गट व भाजपच्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी खुले आव्हानच दिले आहे. छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर यावर सत्ताधारी आमदारांनी माझ्यासमवेत वादविवाद करावा, यात जो हरला त्याने पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान यावेळी मिटकरी यांनी दिले. छत्रपती संभाजी महाराजांचे धर्मवीर म्हणून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजप आणि तत्सम संघटना करत आहे. जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांना संभाजीराजेंवर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. आजकाल राजकीय नेत्यांना धर्मवीर ही पदवी लावण्यात येते. छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ होते असे म्हणून शिंदे गटातील आमदार स्वतःची तुलना त्यांच्यासमवेत करण्याचा कोविलवाणा प्रयत्न करीत आहे. यावर कळस म्हणजे, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हेदेखील स्वतःला ‘धर्मवीर’ म्हणवून घेतात, अशी टीकादेखील आ. मिटकरी यांनी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वर्मावरच बोट ठेवले.

विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्यरक्षक होते, या वक्तव्याचे यावेळी आ. मिटकरी यांनी जोरदार समर्थन केले. तसेच करणी सेनेचे विजय सेंगर यांच्यावर खरपूस टीका करीत त्याला १८१८ ची लढाई तरी माहीत आहे का, असा सवाल मिटकरींनी केला. सेंगर याने छत्रपती उदयनराजे महाराज यांच्यावर टीका केली, राज्यपालांचे समर्थन केले, नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केले आहे, असेही मिटकरी म्हणाले. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी महापुरुषांचे कार्य तर विषद केलेच, पण महापुरुषांवर सतत टीका करणार्‍या भाजप नेत्यांना आपल्या शब्दबाणांनी अक्षरशः सोलून काढले. या जाहीर सभेला बुलढाणा तालुक्यासह देऊळघाट पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!