Breaking newsHead linesMaharashtra

नववर्षाची सुरूवात भीषण स्फोटांनी, नाशिक, बार्शीतील स्फोटांत 9 ठार, इगतपुरीतील आग नियंत्रणाबाहेर!

UPDATE

इगतपुरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत जाहीर
– मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, रुग्णालयात जाऊन जखमींचे सांत्वन

जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येवून भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दवाखान्यात जाऊन जखमी कामगारांची विचारपूस केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीचे मुख्य कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र याबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. या आगीत १९ कर्मचारी जखमी झाले असून यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये राज्य शासनाकडून मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमींवर राज्य शासनामार्फत मोफत उपचार करण्यात येणार आहेत.


– इगतपुरी येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत स्फोट, भीषण आग, दोन महिला ठार
– बार्शी येथील फटाका कारखान्यात स्फोट, सात जण ठार

सोलापूर/ नाशिक (जिल्हा प्रतिनिधी) – नवीन वर्षाची सुरूवातच भीषण अशा आगीच्या घटनांनी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीतील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन सात जण ठार झालेत. स्फोट व लागलेल्या आगीत २० ते २५ स्त्री-पुरूष कामगार होरपळले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. दुसरीकडे, नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर मोठी आग लागली. सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, १७ जण गंभीर जखमी झालेले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी कामगारांना नाशिकच्या सुयश आणि एसएमबीटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही आग अजूनही नियंत्रणाबाहेर हाेती.

नाशिक दुर्देवी घटनेतील जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत मृत झालेल्या दोन महिला कर्मचारी होत्या. महिमा आणि अंजली असे दोघांची नावे आहेत. महिमा यांचे वय २० तर अंजली यांचे वय २७ इतके आहे. दोघांचीही या आगीत मृत्यू झाला, इतर चौघांवर उपचार सुरू आहेत. या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिल्लोडची सभा रद्द करून घटनास्थळी दाखल झाले, तसेच अपघातस्थळी मदतीसाठी हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले होते. हा स्फोट इतका मोठा होता की या त्याचा आवाज आजूबाजूच्या २० ते २५ गावांमध्ये ऐकायला मिळाला. आग इतकी मोठी होती की धुराचे मोठ मोठे लोट आकाशात दिसत होते. कंपनीच्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात अंधार झाल्याचे दिसून आले. स्फोटानंतर तात्काळ अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी आगीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र आग पसरल्याने ती विझवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. आशिया खंडातील सर्वात मोठी पॉलिफिल्मची ही कंपनी असून, येथे १५ हजार कर्मचारी, कामगार काम करतात.

पांगरी येथील फटाका कारखाना बेचिराख

दुसरीकडे, पांगरी गावाजवळील फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. तेव्हा या फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास ४० कर्मचारी काम करत होते. स्थानिक ग्रामस्थांनी आणि अग्निशमन दलाने आग नियंत्रित केली. फॅक्टरीमधील सर्व कर्मचार्‍यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. स्फोटादरम्यान तीन महिलांचा जाग्यावरच मृत्यू झाला. तिन्ही महिलांचे मृतदेह पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले गेले. तीन महिला गंभीर तर एका रुग्णाची परिस्थिती अत्यंत नाजूक झाल्याने त्याला उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या दुर्देवी घटनेत वृत्तलिहिपर्यंत सात जाणांचा मृत्यू झाला होता. बार्शीच्या या फटाका कारखान्यात बांगरवाडी, वालवाड, उकडगाव येथील लोक काम करतात. आज अचानक कारखान्याला स्फोट झाला. परिसरातील गावकर्‍यांनी तातडीने धावत जावून बचावकार्य केले. जखमींना वेळेत उपचार मिळाले नसते तर आणखी अनर्थ झाला असता. मदतकार्यामध्ये सहभागी एका गावकऱ्याने सांगितलं की, स्फोट झाला त्यावेळी आम्ही मदतीसाठी धावून आलो. ऊसाच्या शेतात दोन महिलांचे मृतदेह उडून पडले होते. काही तडफडत पडले होते. आम्ही पोलिसांना आणि अॅम्ब्युलन्सला फोन केला. तब्बल तासभर १०८ रुग्णवाहिका, पोलिस किंवा दुसरी रुग्णवाहिका आली नाही. तेथे उपस्थित असलेले लोक तासभर फोन करत होते. परंतु कुणीही फिरकलं नसल्याचं गावकऱ्याने सांगितलं.


लग्नातील फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे शेतकऱ्याच्या उसाच्या फडाला आग

गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगांव शेत शिवार परिसरात गट नंबर 17 आणि गट नंबर 33 मध्ये चंद्रशेखर आलोने, अवंतिका आलोने, सुरेश आलोने, दत्तात्रय आलोने आणि सुलेमान खान मोहम्मद या शेतकऱ्यांच्या अंदाजे दहा एकर उसाच्या क्षेत्राला आज दुपारच्या दरम्यान आग लागल्याने शेतामध्ये उभ्या असलेल्या साडेचार एकरातील ऊस या आगीच्या घटनेत जळून भस्मसात झाला. शेजारील गुरु सृष्टी लॉन मंगल कार्यालयात आज लग्न होते. लग्नानिमित्त केलेल्या फटाक्याच्या आतषबाजीमुळे उसाच्या फडात ठिणगी पडल्याने उसाच्या फडाला आग लागल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!