यावर्षी आपण 28 वा योग दिवस साजरा करीत आहोत. यावर्षीची संकल्पना आहे, “मानवतेसाठी योग” आणि मन, वचन, कृती आणि आचरणाने चांगला मनुष्य कसा बनवू शकतो आणि योगाच्या मदतीने मानवतेसाठी कसे कार्य करू शकतो, हा यामागचा विचार आहे. योग ही एक अशी शक्ती आहे, ज्यायोगे सुख, आरोग्य, आनंद, शांती यांचा अनुभव अंतर्मनाने घेता येतो. योग व्यक्तीच्या अंतरी चेतना व बाह्य जग यामध्ये सतत संबंधाची जाणीव वाढवतो.
यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. म्हणूनच 21 जून रोजी राष्ट्रीय स्तरावरील 75 महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सामायिक योग प्रोटोकॉल अंतर्गत प्रात्यक्षिके दाखविली जातील. परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या सर्वांगीण विकासामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून योगशास्त्राचे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणूनच योगाभ्यास, ध्यान, चर्चासत्र अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे जागतिक योग दिन साजरा केला जातो. वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि योग आपणास दीर्घायुष्य प्रदान करतो, म्हणून 21 जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मान्य झालेला योग दिन 2015 पासून 193 देशांपैकी 175 देशात उत्साहाने साजरा केला जातो. गेल्या काही काळात आयुष्याचे गणित अनेकांना उमगले, असे म्हणता येईल कोरोनाच्या महासंकटाने आपल्याला सजग बनवले, जीवनावश्यक मूलभूत गरजा काय? त्याची खरी ओळख मानवाला झाली आहे, किंबहुना व्हायला लागली आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हा धर्म भेद दूर करून मानवता हा एकच धर्म प्रत्येकाला समजले आहे आणि हा भाव सर्वत्र रुजू लागला आहे.
आपण कोरोना काळात अनेक चढउतार अनुभवले, बघता-बघता होत्याचे नव्हते झाले, डोळ्यासमोर जवळची माणसे आपण गमावली. रक्ताच्या नात्यापेक्षाही माणुसकीचे नाते जपणारी एक प्रणाली विकसित झाली. यशाचा समृद्धीचा आलेख धपकन खाली आला आणि जीवनाचे गमक समोर आले. आयुष्य किती क्षणभंगुर आहे, हे जाणवले. याचा संपूर्ण परिणाम शरीरावर तर झालाच पण त्याचबरोबर मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक शैक्षणिक आणि कुटुंब, अशा सर्व स्तरांवर तो पाहायला मिळाला.
सध्याच्या भोगविलासी जीवनशैलीचे जागतिक, नैसर्गिक, आपत्तीजनक घडामोडींचे नकारात्मक परिणाम संपूर्ण मानवजातीवर, निसर्गावर दिसून येत आहे. यातून मार्ग काढायचा असेल, चांगले आयुष्य जगायचं असेल, जर देशाला पुन्हा उज्वल भविष्याकडे घेऊन जायचे असेल, तर आधी स्वतःचे व त्यायोगे समाजाचे मानसिक स्वास्थ्य उत्तम हवे. समाजात बंधुभाव, करुणा, शांती, दया आणि एकता हे भाव निर्माण होणे आवश्यक आहे. ‘एकमेकांस सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ।’, ‘हे विश्वची माझे घर।’ असे म्हणत मानवता जपली पाहिजे आणि त्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी, स्वतःपासून व्हायला हवी. योगाभ्यास त्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. जगातील लोकांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत देखील धीर धरून राहण्याची क्षमता निर्माण करेल. योग हे असे शास्त्र आहे, जे अंतर्मनातून आनंद, शांती, स्वास्थ देत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करेल.
आरोग्य हेच सर्वात मोठे धन आहे व त्याला नेहमी सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मनुष्याला कार्य करण्यास उत्साह देते, यशस्वी बनवते, एक शिस्तबद्ध जीवन जगण्याची ताकद आपल्याला आली, की सर्व काही सुपर व मंगल होते. योगशास्त्र हे आपल्या प्राचीन संस्कृतीची देणगी आहे, ज्यायोगे आपण आपल्या आयुष्यमान आरोग्यदायी, सुख, समृद्धी, समाधान युक्त जगू शकतो.
योगाभ्यासाने मानवतेचे दुःख कमी करून कोरोनानंतरच्या अनेक समस्यांवर मात करण्याचे बळ नक्कीच मिळेल. योग विद्या म्हणजे मानवतेची साधना आहे. या विद्येमध्ये सर्वांना आपल्या सोबत जोडण्याचे सामर्थ्य आहे. अनेक देशही याचे अवलोकन करून योग अंगीकारत आहेत. योग विद्येच्या जडणघडणीसाठी भारत सरकार कटिबद्ध असून या विद्येला फक्त भारतासाठी सीमित न ठेवता भारताबाहेर देखील रुजवले आहे. त्याला व्यापक स्वरूप दिले आहे. योग विद्येला कोणताही संप्रदाय, जाती-धर्म नाही, तर ती जीवन जगण्याची कला आहे. योग आपल्याला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बरोबर व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे.
देशातील नवीन पिढी जी भारताच्या उज्ज्वल भविष्याची पहिलीच शिडी आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक शाळा-महाविद्यालयात योगाभ्यासाचा समावेश केला पाहिजे. आजची धावपळ, तणावयुक्त जीवनशैली पाहता आपण सर्वांनी योग विद्याचा अभ्यास केला पाहिजे. आज या प्राचीन शास्त्राला संपूर्ण विश्वाने स्वीकारले आहे. मूलभूत गरजांमध्ये योगाभ्यासाचा समावेश केला, तर नक्कीच निरामय दीर्घायुष्य जगू शकू आणि म्हणूनच त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला, हे देखील योग्यच आहे.
योग विद्या घराघरात पोहोचवून लोकांना स्वस्थ ठेवण्याचे काम अनेक योग गुरु करत आहे. आज काळाच्या ओघात व ऑनलाइनच्या जमान्यात प्रत्येकासाठी योगा अभ्यास करणे सोयीचे झाले आहे. म्हणूनच प्रत्येकाने स्वतः इतरांना प्रोत्साहन देत उत्साह वाढवत योगा अभ्यास केला पाहिजे. योग अभ्यासाने केवळ शरीर नाही, तर मन देखील स्वस्थ होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे स्वास्थ्य चांगले असेल, तेव्हा त्याच्या परिवाराचे उत्तम स्वास्थ्य राहते आणि परिवार समाजाचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्यात अग्रभागी असतो. शरीर स्वास्थ्यासाठी आसनं खूप चांगले काम करतात, तर मनाच्या मानसिक, भावनिक स्तरावर प्राणायाम उपयुक्त ठरतो, असे वरकरणी दिसत असले, तरी कित्येक वेळा आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा शरीराच्या अंतर्भूत अवस्थांवर नियंत्रण आणून शांत, समाधानी, निरोगी, आयुष्य जगण्याची वृत्ती तयार योग करते. आपल्याला अंतःकरणाच्या शुद्धीची आवश्यकता असते. छोट्या-छोट्या गोष्टींनी दुःखी न होता खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीत उभे राहण्याची, लढण्याची मानसिक शक्ती योगाभ्यास आपणास देतो, म्हणूनच जीवनातील अनेक उतार-चढाव अनुभवत असताना दृढ संकल्पाने उभे राहून पुढे ध्येयाप्रत जाण्यासाठी आपण योगाभ्यासामुळे सज्ज असतो. तीच आजच्या काळाची गरज आहे. तरुणाई अनेक भौतिक सुखात रममाण आहे. त्याचे दुष्परिणाम समाजात बदललेल्या नैतिकतेच्या स्वरूपात आपण बघतो, म्हणूनच योगाच्या ‘चित्तवृत्ती निरोधः।’ या पतंजलीच्या वाक्यानुसार आपल्याला त्याचा प्रचार-प्रसार करणे, योग शास्त्राला रुजवणे आवश्यक आहे.
‘युज्यते अनेन इति योग:।‘ योग म्हणजे जोडणे. शरीर, बुद्धी, मनाचे आत्म्याशी जोडले जाणे, शारीरिक, मानसिक विकार घालवण्याचे संजीवनीतुल्य शास्त्र आजही मानवाला जीवनदान देण्यासाठी समर्थ आहे. आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली चुकीची दिनचर्या व ऋतुचर्या यामुळे शरीरांतर्गत प्रदूषण आणि बाहेरील प्रदूषणाने मानवाला जीवन नकोसे झाले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने सर्व रोग कष्टप्रद झाले आहे आणि म्हणूनच सक्षम, सदृढ, आरोग्यदायी, उज्ज्वल भारताचे विश्वाचे स्वप्न पाहायचे असेल, तर जनतेने आरोग्याचे महत्त्व जाणले पाहिजे. म्हणूनच योग दिनाचे औचित्य व त्यायोगे आजन्म आरोग्य संपादन, हे मुख्य ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आबालवृद्ध, स्त्री-पुरुषांना सोपा असा स्वास्थप्राप्तीचा मार्ग म्हणजे योगशास्त्र.
मानवता समाजात रुजवायची असेल, एकमेकांना सोबत घेऊन पुढे जायचे असेल, उत्क्रांती घडवायची असेल, तर योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठीची एक अद्भुत विद्या आहे, जिला हजारो वर्षांपूर्वी भारताच्या प्रज्ञावंत ऋषिमुनींनी अविष्कृत केले होते. तसे अनेक दाखले देखील आपल्या वेदांमध्ये आहे. महर्षी पतंजलींनी अष्टांगयोग रूपात ते आपल्या समोर आणले. त्यांना योगदर्शनाचे संस्थापक मानले गेले आहे. पतंजली योगशास्त्रानुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ती आपल्या मनाला शांत करू शकते, शाश्वत ब्रह्मात सामावू शकते. आपल्या चित्तःवृत्ती वर नियंत्रण करण्यासाठी पतंजलींनी ‘अष्टांगयोग’ सांगितला आहे. त्याला ‘राजयोग’ देखील म्हटले जाते.
ते ‘अष्टांगयोग’ म्हणजे 1) यम : याअंतर्गत सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. 2) नियम : संतोष, प्रसन्नता, स्वाध्याय, ईश्वर प्राणीधन. 3) आसन : आपले शरीर निश्चल राहून सुख मिळते. 4) प्राणायम : मनाच्या शांतीचे साधन. 5) प्रत्याहार : वस्तूंपासून भोगांपासून इंद्रियांना परावृत्त करते. 6) धारणा : चित्ताला बांधून ठेवणे. 7) ध्यान : धारणेच्या विषयावर स्थिर होणे. 8) समाधी : योग ही अध्यात्मिक विज्ञान पूर्ण जीवन शैलीत जगण्याची चिकित्सापद्धती आहे. योगाभ्यासाला जाती, प्रांत, लिंग, संप्रदायांचे बंधन नाही. योग कोणीही करू शकतो. योग्य शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, बौद्धिक, शैक्षणिक आणि अध्यात्मिक अशा सर्वांगीण पातळीवर काम करतो.
योगाचे फायदे : शारीरिक अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते, स्नायूंना बळकटी, फुफुसाचे कार्य उत्तम, हृदयाचे रक्ताभिसरण चांगले होते, हाडांचा लवचीकपणा वाढतो, सर्व अवयवांचा विकास होतो व शरीराची कार्यक्षमता वाढते, मानसिक प्रसंगावधान येते, निर्णय क्षमता चांगली बनते, मन हे शांत, आनंदी उत्साही बनते, मनावरील ताण-तणाव दूर होऊन सजगता येते, कौटुंबिक, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने प्रेम, माया, आपुलकी वाढते, आनंद व उत्साह वाढतो, समाधानी, शांत वृत्तीने नातेसंबंध टिकून ठेवण्यास मदत होते, सामाजिक, कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असल्याने सामाजिक जाणिवेतून समाज प्रबोधन व आरोग्य सुधारले जाते, भांडण-तंटे, मारामारी इ. अनेक गोष्टींना आळा बसून सामाजिक भावना, शांतता प्रस्थापित होते व बौद्धिक आकलन शक्ती व स्मरणशक्ती वाढते, सहजता येते, मुलांमध्ये बुद्धीवर्धन दिसून येते शैक्षणिक कौशल्य गुणांचा विकास होतो, कल्पकता वाढते, खेळांमध्ये प्रगती होते, बल वाढते, चारित्र्य घडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते, अध्यात्मिक, तणावमुक्त आनंदी, समाधानी शरीर व मन इंद्रिय ईश्वराधीन होते, षड्रिपूपासून दूर होतो, सद्सद्विवेक बुद्धी प्रगल्भ होते.
सद्यस्थितीत आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत व त्यासाठी योगाभ्यास यामधील काही आसने प्राणायाम उपयुक्त ठरत आहे. परंतु, ती योग्य मार्गदर्शनाखाली केलेलीच उत्तम.
चला तर मग, सर्व मिळून अज्ञानमय आयुष्याच्या प्रांगणात योगाभ्यासाचा, ज्ञानाचा, आरोग्यमय दीर्घ आयुष्याचा तेजस्वी दिवा लावूया. एकच दिवस किंवा एकच महिना योग अभ्यास न करता ती मूलभूत गरज ओळखून आत्मसात करून अंगीकार करुया. सदृढ आयुष्याची गुरुकिल्लीची शिदोरी जवळ बाळगूया. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग साधनेला अंगिकारून आत्मोन्नतीचा मार्ग अवलंबून वैश्विक शांती, सदाचार, उन्नतीसाठी खारीचा वाटा उचलूया, मानवतेची ज्योत निरंतर तेवत ठेवूया.
उपयुक्त आसने :
1) उच्च रक्तदाब : सेतुबंधासन, अधोमुख श्वानासन, विपरीत करणी आसन, उत्तानासन, कपालभाती, अनुलोम विलोम, सीत्कारी, दीर्घश्वसन इ.
2) मधुमेह : हलासन, मण्डुकासन, सर्वांगासन, वक्रासन, पवनमुक्तासन, पश्चिमोत्तानासन, सेतुबंधासन, चालणे, भस्त्रिका, कपालभाती इ.
3) थायरॉईड : नौकासन, मत्स्यासन, भुजंगासन, उष्ट्रासन, विपरीत करणी आसन, हलासन, मार्जरी आसन, जानुशिर्षासन, उज्जयी, कपालभाती, नाडीशोधन, भस्त्रिका.
योग, निद्रा ही देखील अनेक मानसिक व शारीरिक व्याधींवर उपयुक्त ठरते. (तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे)
(डॉ. ऋषभ सुरेशचंद मंडलेचा हे बीएएमएस आयुर्वेदाचार्य आहेत. डॉ. वैशाली पवन लोढा (बीएएमएस आयुर्वेदाचार्य, योगाभ्यास शिक्षिका) यांच्या मार्गदर्शनानुसार}
Leave a Reply