Breaking newsCrimeHead linesMaharashtraPachhim Maharashtra

महाराष्ट्र हादरला, कर्जबाजारी कुटुंबाची आत्महत्या, ९ मृतदेह सापडले

– कर्जबाजारी असल्याने आत्महत्या केल्याचा संशय

सांगली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील ९ जणांनी सामूहिक आत्महत्या केली. सर्व सदस्यांनी विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. मृतक हे डॉक्टर परिवारातील होते. सोमवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डॉक्टर दाम्पत्याच्या एका खोलीत सहा तर दुसर्‍या खोलीत तीन मृतदेह मिळाले. नेमकी आत्महत्या का केली हे कळत नसले तरी, शेजार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते. त्यातून हा दुर्देवी प्रकार घडलेला असावा.मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा व्हनमोरे आणि पोपट यल्लपा होनमोरे या दोन भावाच्या कुटुंबातील ९ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घरात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसर्‍या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले.
या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, मृतदेह शवपरिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. या कुटुंबाने अनेकांकडून कर्ज घेतले होते. त्यापोटी त्यांना अनेकांनी तगादा लावला होता. त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!