मेहकर (रवींद्र सुरूशे) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मेहकर येथे माळी समाजाची आढावा बैठक स्वर्गीय भास्करराव शिंगणे खंडाळादेवी येथे दुपारी तीन वाजता संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल रुक्मिणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव मगर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती आशाताई झोरे, शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, माजी सभापती परसरामजी बोराडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर कुडके यांनी केले. ३ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रत्येक गावोगावी साजरी करणे, मेहकर येथील गाभणे हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे जाण्यासाठी प्रत्येक गावांमधून महिला व पुरुषांसाठी एक एक गाडी नेण्याचे या वेळेस सर्वानुमते ठरले. अशा विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर नवनियुक्त सरपंच गयाबाई अरुण पोपळघट यांचे पती अरुण पोपळघट यांचा माळी समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नवनियुक्त शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष कळंबेश्वर तोलाजी जाधव, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संदीप ढोरे, राजेश मगर, निंबाजी पांडव, परसराम बोराडे, आशाताई झोरे, वसंतराव मगर यांनी आपले विचार मांडले. या बैठकीसाठी असंख्य माळी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक केशव गिर्हे यांनी केले.
————