‘आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो’ जयघोषाने भगवतीदेवीची यात्रा उत्साहात!
– नाईचाकूर येथे उसळली भाविकांची गर्दी, दागिने-मोबाईल चोरट्यांनीही केली यात्रा साजरी
उस्मानाबाद (विठ्ठल चिकुंद्रे) – उमरगा तालुक्यातील नाईचाकूर (भगतवाडी) येथील उंच डोंगरावर बसलेली भगवतीदेवीची यात्रा उत्साहात साजरी झाली. पहाटे चार वाजता देवीचे पुजारी सुधाकर मेकाले यांनी देवीला अभिषेक करून खणानारळाने ओटी भरली. भाविक भक्तांनी सकाळपासुन देवीची दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राठोड यांनी चोख बंदोबस्त लावला होता. तरीपण महिलांच्या गळ्यातील सोने चांदीच्या दागिण्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या घटना घडल्यात. तसेच, मोबाईलदेखील मोठ्या प्रमाणात चोरीस गेले आहेत. जगदंबा देवीचे ट्रस्टी रावसाहेब पवार व त्यांचे सदस्य यांनी व्यापार्यांना बसण्यासाठी व्यवस्था केली. तसेच, व्यापार्याची व देवीच्या भक्तांना पाण्याची व्यवस्था केली होती.
कोरोनामुळे मागील दोन वर्षे यात्रा भरली नव्हती. यावर्षी भाविक भक्तांनी कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यामुळे यात्रेत मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासन व जगदंबा देवीचेवतीने कोरोनाचे नियम पाळण्यासाठी मास्क लावण्याचे भाविक भक्तांना आवाहन करण्यात आले होते. नाई चाकूर व परिसरातील बाहेरगावी असलेले नागरिक दिवाळीत आपल्या गावी येत नाहीत, पण आपल्या देवीच्या यात्रेला वेळ आमोशाला नक्की येतात. आपल्या लेकींना यात्रेला येण्याचे निमंत्रण देतात. देवीचे दर्शन व देवीला नवस फेडण्यासाठी येतात. नवसाला पावणारी भगवती देवी आहे, भाविक भक्त उंच डोंगरावर बसलेल्या भगवती देवीला डोंगराच्याकडेने पाच दोन फेर्या घालून व खणा नारळाची ओटी भरेन असे नवस बोलतात, व भगवती देवीचा नवस फेडतात.
यात्रेचे मुख्य आकर्षक म्हणजे आराध्याचा निघालेला छबिना. भाविक भक्त सकाळी आल्यानंतर देवीचे दर्शन घेतात व यात्रेचे खरेदी करतात, पण पण देवीचा छबिना निघाल्याशिवाय आपल्या गावी परत जात नाहीत. छबीन्यात आराधी मंडळी आपल्या घरातील परडी माळ पोत घेऊन देवीला भेटवण्यासाठी येतात. डोंगराच्या पायथ्यापासून छबिना निघतो व डोंगराला फेर्या घालून छबिनाची सांगता होते. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील भाविकभक्त या यात्रेला गर्दी करतात. कुंकू हळद घेण्यासाठी मोठी गर्दी केले जाते. यावेळी तुळजापूरचे सुप्रसिद्ध पेढे वाले, खेळणे, हॉटेल, देवीला नवस फेडण्यासाठी डोळे टिळे साडी चोळी छोटे मोठे व्यापार्यांनी आपले दुकाने थाटले होते. भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.