– पालकांचे पित्त खवळले; शिक्षण विभागाला जाग केव्हा येणार?
मेहकर (रवींद्र सुरूशे) – उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे (इयत्ता बारावी) केंद्र देऊळगाव माळी ता. मेहकर येथे देण्यात यावे, यासाठी पालकांनी प्राचार्य, शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी लावून धरली आहे. परंतु त्यांच्या या मागणीकडे शिक्षण विभागाने लक्ष न दिल्यामुळे शेवटी पालकांनी प्राचार्य विश्वनाथ बाहेकर यांच्यामार्फत शिक्षण अधिकारी व शिक्षण संचालन विभाग यांच्याकडे निवेदन दिले आहे. तसेच, आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनामध्ये म्हटले की, इयत्ता बारावीच्या होणार्या मार्च २३ च्या परीक्षेमध्ये देऊळगाव माळी येथील विद्यार्थ्यांना वडगाव माळी हे अत्यंत, आडवळणाचा रस्ता व वाहतुकीच्या सुविधा नसलेला परीक्षा केंद्र आहे. मुलींच्या दृष्टीने सुरक्षिततेचा बाबतीत अत्यंत घातक असलेले हे परीक्षा केंद्र असल्याचे पालकांना समजले. तसेच परीक्षा कालावधीत या आडवळणी रस्त्याचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे परीक्षा केंद्र हे स्थानिक शाळेमध्येच देण्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. देऊळगाव माळी येथील २०४ विद्यार्थी संख्या असताना केवळ ३० -३२ विद्यार्थ्यांच्या भरोशावर वडगाव माळी या आडवळणाच्या गावामध्ये परीक्षा केंद्र कसे काय दिले जाऊ शकते? व ते शिक्षण विभागाने सुद्धा मान्य कसे केले? असा जाब विचारला. त्वरित परीक्षा मंडळाने आमच्या मागणीची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे परीक्षा मंडळाला पालकांनी दिला आहे.
केवळ ३२ पोरांच्या सोयीसाठी एवढ्या मोठ्या शेकडो विद्यार्थी व पालकांना होणारा त्रास अनाठायी आहे. देऊळगाव माळी हे मेहकर-साखरखेर्डा रोडवरील अत्यंत सर्व सोयीसुविधायुक्त गाव असून, याच ठिकाणी परीक्षा केंद्र द्यावे. याबाबतीत परीक्षा मंडळाने दखल घेऊन परीक्षा केंद्र देऊळगावमाळी येथे द्यावे अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालकांनी दिला आहे. या निवेदनावर नारायण चाळगे, भागवत मगर, विश्वनाथ मगर, संदीप सुरूशे, हरिभाऊ मगर, गजानन चाळगे, व बळी मामा, भगवान अंभोरे, दत्तात्रय दायजे यासह शेकडो पालकांच्या स्वाक्षर्या या निवेदनावर आहे.
पालकांच्या मागणीनुसार आम्ही आम्ही शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु अजून ठोस निर्णय घेण्यात आला नाही.
– प्राचार्य विश्वनाथ बाहेकर
देऊळगाव माळी येथेच परीक्षा केंद्र देण्यात यावे. अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.
– भगवान अंभोरे, नारायण चाळगे, समस्त पालकवर्ग
————–