ChikhaliVidharbha

चेतन म्हस्के ठरले चिखली तालुक्यातील सर्वात कमी वयाचे सरपंच!

चिखली (विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल जाहीर झाले असता, तालुक्यातील सर्वात कमी वयाचे सरपंच म्हणून सरपंचपदी जनतेतून निवडून आलेले चेतन म्हस्के पाटील हे ठरले आहेत. त्यांचा रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

चेतन पाटील यांचे वडील स्व. राम पाटील हे पंचक्रोशीत जनता बस म्हणून प्रसिद्ध होते, समाजातील दीन दुबळ्या घटकांच्या सदैव मदतीस धावून जाणारे, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे सदैव किंग मेकरच्या भूमिकेत असणारे स्व.राम पाटील यांची पंचक्रोशीतील एक वेगळी ओळख होती. चेतन यांना मुळातच आपल्या आजोबा, पंजोबा वडिलांपासूनच समाज कार्याचा वारसा मिळालेला आहे. त्यांचे पंजोबा गणपत पाटील, फकिरा पाटील, दौलतराव पाटील यांनी वेळोवेळी सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्याच बरोबर जगन्नाथ पाटील यांनी १९८३ मध्ये सरपंच पदाची जबाबदारी सांभाळली होती. आजोबा रामचंद्र म्हस्के यांनी बरीच वर्षे पोलिस पाटील म्हणून काम पाहिलेले आहे. तर डॉ.अच्युतराव म्हस्के हे त्या काळातील एमबीबीएसचे शिक्षण घेतलेले लोकप्रिय डॉक्टर होते. त्यांचे वडील राम पाटील यांनी १९९७ मध्ये सर्वानुमते त्यांची पत्नी संगिता म्हस्के यांना सरपंच करण्याचे ठरविलेले असतांना देखील त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत गावातील अविवाहित तरुण युवक वाल्मीक अंभोरे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ टाकली. त्यानंतर २००२ ला एससी आरक्षण असल्यामुळे त्यांची वर्णी सरपंच पदी लागू शकली नाही. परत २००७ ला त्यांनी संपूर्ण पॅनल निवडून आणले, परंतु स्वतः सरपंच न होता गावातील उच्चशीक्षित असलेले शिवणारायण म्हस्के यांना सरपंचपदाची संधी दिली.

दोन वेळेस सरपंच पदाची संधी मिळून देखील राम पाटील यांनी स्वतः माघे राहून नवं तरुणांनाच संधी दिली. त्यातच त्यांचे २०१० ला हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे राम पाटील यांना सरपंच पदी बघण्याचे स्वप्न पांढरदेव येथील नागरिकांचे अपूर्णच राहीले होते. म्हणून यावेळेस राम पाटील यांचे चिरंजीव चेतन पाटील यांच्या रुपाने ग्रामस्थांनी हे स्वप्न पूर्ण केले. चेतन म्हस्के हे कृषी विषयात पदवीधर असून, उत्कृष्ट शेतकरी उच्चशिक्षित तरुण असल्याने गावकर्‍यांच्या खास आग्रहाखातर ते निवडणूक रिंगणात उतरले व ही निवडणूक त्यांनी दोनवेळा सरपंच असलेल्या उमेदवाराला हरवून भरघोस मतांनी विजय मिळवला. त्यांचे मेव्हणे नितीन आंभोरे व वडिल राम पाटील यांच्याशी असलेले हितसंबध व चेतन पाटील यांचे कार्य बघून चिखली तालुक्यातील सर्वात तरुण सरपंच म्हणून निवडून आल्याबद्दल माजी कृषी, पणन, पाणीपुरवठा, फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी फोन करून चेतन पाटील यांचा कौतुक केले व क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य राजेश म्हस्के, भागवत म्हस्के, विश्वास म्हस्के, नितीन अंभोरे, सचिन पडघान, सचिन काकडे आदी उपस्थित होते.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!