– शहीद भगतसिंग समाजसेवा मंच दरेगाव व समाजसुधारक बहुउद्देशीय मानवताहित संघटना नागपूर यांनी उचलला प्रश्न
चिखली (विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील दरेगाव येथील मरणासन्न झालेल्या जिल्हा परिषद शाळेबाबत थेट उपमुख्यमंत्र्यांकडे गार्हाणे मांडण्यात आले होते. त्यानुसार, उपमुख्यमंत्र्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, सिंदखेडराजाच्या गटविकास अधिकारी (बीडीओ) यांनी प्रत्यक्ष येऊन शाळेची पाहणी केली असून, ते वरिष्ठांना याबाबत वस्तूनिष्ठ अहवाल सादर करणार आहेत. ही शाळा नूतन वास्तूत स्थलांतरीत होईल व येथे दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना लागून आहे.
दरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची अतिशय दुरवस्था व जीर्णावस्था झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांसोबत भविष्यात जीवितहानीसारखा दुर्देवी प्रसंग उद्भवू शकतो. ही भीती पाहता, असे काही होऊ नये, या उद्देशाने शहीद भगतसिंग समाजसेवा मंच दरेगाव व समाजसुधारक बहुउद्देशीय मानवताहित संघटना नागपूर या संघटनांच्या पदाधिकार्यांनी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या शाळेची झालेली दुरवस्था लक्षात आणून दिली होती. उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांचे प्रधान सचिव यांना सांगून श्रीमती भाग्यश्री विसपुते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना प्राथमिक शाळा दरेगाव शाळेची पाहणी करून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या या आदेशानुसार, गट विकास अधिकारी सिंदखेडराजा व संबंधित अधिकारी हे २१ डिसेंबररोजी दरेगाव येथे आले व त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची बारकाईने पाहणी केली. त्यादरम्यान सदरील अधिकार्यांना शहीद भगतसिंग समाजसेवा मंचाचे कार्यकर्ते स्वतः उपस्थित राहून सदरील शाळेची झालेली मरणासन्न अवस्था अधिकार्यांच्या लक्षात आणून दिली. शाळेची पाहणी केल्यानंतर याबाबत वरिष्ठांना तातडीने अहवाल सादर करू, असे या अधिकार्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून ही शाळा दर्जेदार व नूतन वास्तूत रुपांतरीत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना लागून आहे.
————–