भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाने निधन
पुणे (विशेष प्रतिनिधी) – पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक यांची कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी आज, २२ डिसेंबररोजी दुपारी साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी ११ वाजता पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्या ५७ वर्षांच्या होत्या.
आमदार मुक्ता टिळक पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. अडीच वर्ष त्यांनी पुण्याच्या महापौर म्हणूनही कार्यभार सांभाळला. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षाच्या पहिल्या महापौर ठरल्या. त्यानंतर २०१९ मध्ये विधान सभेच्या कसबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. लोकमान्य टिळकांच्या त्या नातसून होत. अभ्यासू व जिद्दी नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मुक्ता टिळक यांनी पुण्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवले होते. काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना मतदानासाठी मुंबईत एअरअॅम्ब्युलन्सने नेण्यात आले होते. नेहमीच कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणार्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
मुक्ता शैलेश टिळक २०१९ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. महापौर म्हणून केलेल्या कामावर खूश होऊन पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. गिरीश बापट यांच्या कसबा मतदारसंघातून त्यांनी दणक्यात विजय मिळवून विधानसभेत पाऊल ठेवले. पण त्याचवेळी त्यांना कर्करोगाची लागण झाली. पुढे दोन ते अडीच वर्ष त्यांना कर्करोग आणि अनेक व्याधींनी ग्रासले. त्यामुळे सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर अतिशय कमी झाला होता. पण रुग्णालयातून त्या लोकांची कामे करत राहिल्या, अधिकार्यांना सूचना देत राहिल्या. पण आज कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. मुक्ता टिळक यांनी पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर फर्ग्युसून महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, मानसशास्त्र विषयातून त्यांनी एम.ए केले होते. शिवाय, मार्वेâटिंग विषयाच्या त्या एमबीए होत्या. त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता.
—————–