सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – अनुदानित वसतीगृह कर्मचा-यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे २६ डिसेंबर २०२२ पासून धरणे आंदोलन व भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्थेमार्फत २३८८ अनुदानित वसतीगृह कार्यरत आहेत. या वसतीगृहामध्ये जवळपास एक लाख विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहे. त्यांचे संगोपनाचे काम करणारे कर्मचारी २४ तास सेवा देत आहे मात्र या कर्मचा-यांना तुटपुंजे मानधन दिले जाते. त्यामुळे वस्तीगृह मधील कर्मचारी वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी 26 डिसेंबर पासून नागपूर येथे धरणे आंदोलन मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. वसतीगृहाची योजना १०० टक्के अनुदानावर असून कर्मचारी मात्र मानधनावर आहे. अनुदानित वसतीगृहाची योजना ही शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची मुळची योजना आहे. त्यानंतर १९६७ ला वि.जा.भ.ज.च्या आश्रमशाळा, आदिवासी खात्याची आश्रमशाळा संलग्न निवासी वसतीगृहे, अपंगासाठी शाळा व वसतीगृह निर्माण करुन तेथील कर्मचारी हे नियमित वेतनश्रेणीवर/ कायम शासकीय सेवेत कार्यरत आहेत. मात्र संबधीत विभागाने अनुदानित वसतीगृह ८१०४ कर्मचा-यांना केवळ अल्प मानधनावर काम करुन घेतले जात आहे.
त्यामुळे विषयान्वये कर्मचा-यांना सेवा शाश्वती, समान काम, समान वेतन धोरणानुसार तात्काळ वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे धरणे अंदोलन व भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी अध्यक्ष मारुती कांबळे, सचिव अशोक ठाकूर, कोषाध्यक्ष दत्ता पाटील, मुख्य प्रवक्ता भाऊ कुनघाडकर यांच्या दिलेल्या पत्रकावर सह्या आहेत.