सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी सरासरी ८१.१९. टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने यंदा मतदानाची टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, उद्या (दि.२०) मतमोजणी व नंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.
१८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी त्यापैकी १२ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. १५ गावचे सरपंच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित जागासाठी मंगळवारी मतदान झाले. सकाळ पासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यानच सरासरीत ७० टक्के मतदान झाले. यंदा करमाळा तालुक्यातील २८, माढा ८, बार्शी १९, उत्तर सोलापूर १२, मोहोळ ९, पंढरपूर १०, माळशिरस ३४, सांगोला ५, मंगळवेढा १६, दक्षिण सोलापूर १६ तर अक्कलकोट तालुक्यातील २० ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.
यंदाच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक नेत्यांना आणि आघाड्यांना मोठे महत्व प्राप्त झाले होते. त्यामुळे पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक नेत्यांचा प्रभाव या निवडणुकांवर दिसून येत होता. मतदानादरम्यान तसेच निवडणुकीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विविधि ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे तर निवडणूक निकालानंतर मिरवणुकांना बंदी घालण्यात आल्यामुळे शांततेत मतदान झाले. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता मतमोजणी होणार आहे.
स्थानिक आघाड्यांना महत्व!
गाव पातळीवरील ग्रामपंचायतमध्ये पक्ष राजकारणापेक्षा स्थानिक आघाड्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या माध्यमातून या निवडणुका झाल्या आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये पक्ष विरहित मतदान झाले आहे.
———————