आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज!
सांगली (संकेतराज बने) – महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीच्या जत तालुक्याचा मुद्दा आणि पाणी प्रश्नावरून सीमा भागात तणावाचे वातावरण असतानाच बेळगावी येथे मराठी भाषिकांच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडीच्या कोल्हापुरातील पदाधिकार्यांना आणि कार्यकर्त्यांना कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी महामार्गावरील दुधगंगा नदी पुलावर रोखले. तसेच, वेळी या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जदेखील करण्यात आल्याने प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे.
कर्नाटकात प्रवेश करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, यांच्यासह कार्यकर्ते बॅरॅकेटस जवळ येताच कर्नाटक पोलिसांनी लाठीचार्ज करत मागे केले. या घटनेने महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला. महामार्गावरील एका बाजूची वाहतुक बंद करावी लागली. महाराष्ट्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत आमदार हसन मुश्रीफ, शिवसेनेचे विजय देवणे, काँग्रेसचे सचिन चव्हाण आदी पदाधिकार्यांना ताब्यात घेत पोलीस गाडीत बसवले. मात्र, काही वेळानंतर त्यांना सोडून दिले. यावेळी कर्नाटक पोलिसांनी माझ्यावरही लाठीमार केल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे. सुनिल मोदी, आर. के पोवार, राजु लाटकर, भय्या माने, आदील फरास, भारतीताई पवार विद्या गिरी, कांचन माने असिफ मुल्लाणी , संजय चितारी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
—————–