Breaking newsHead linesMaharashtraNagpurPolitical NewsPolitics

सीमाप्रश्नावरून अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले!

– कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही, राज्य सरकारने मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे रहावे -विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
– प्रचंड गदारोळानंतर पहिल्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाज ठप्प

नागपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाहीमूल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने केले आहे. यापुढे कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नसल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची जोरदार मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेच्या सभागृहात केली. सीमाप्रश्नावरून अजितदादांनी आज शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले. तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारला घेरले होते. प्रचंड गदारोळामुळे पहिल्याच दिवशी विधिमंडळाचे कामकाज ठप्प पडले होते. तत्पूर्वी, सकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली. ‘कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय… शिंदे सरकार हाय हाय… गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… ५० खोके एकदम ओके… खोके सरकार काय म्हणतंय, गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय… शेतकर्‍याला मदत नाय म्हणतंय…महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक..’ अशा घोषणांनी सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली व विधानभवन परिसर दणाणून सोडला.

आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. दुसरीकडे, सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अख्ख्या मंत्रिमंडळालाच झापले. मंत्र्यांकडून नवे पायंडे पाडले जात असल्याने अजित पवार संतप्त झाले होते. काही मंत्री शर्टाच्या खिशाला पक्षाची चिन्ह असलेले बिल्ले लावून विधानसभेत आले होते. त्यामुळे अजित पवार भडकले. तुम्ही मंत्री आहात. मंत्र्यांनी असे पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल, असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याचा मुद्दाही अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी पवार म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावाद अनेक वर्षापासून प्रलंबीत आहे. तरीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सीमावाद उफाळून आला असून, दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण आहे. सीमावादाच्या याप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे या प्रश्नावर योग्य तोडगा निघणे अपेक्षित होते. मात्र ते होताना दिसत नाही. गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतरसुध्दा कर्नाटक सरकारची मुजोरी कायम आहे. बेळगावमध्ये दि.१९ डिसेंबर २०२२ पासून कर्नाटक विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे. दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये या दिवशी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांना बेळगावात प्रवेश नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोणत्याच नेत्यांना तेथे जाता येऊ नये, यासाठी बेळगावच्या हद्दीतील कोगनोळीसह २१ सीमानाक्यांवर हजारो पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कर्नाटकने आपली आडमुठी भूमिका कायम ठेवली आहे, दि. १९ डिसेंबर रोजी बेळगावात येण्याची परवानगी खासदार धैर्यशील माने यांनी तेथील जिल्हाधिकार्‍यांच्याकडे केली होती. परंतु आपल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे सांगत त्यांना बेळगावात बंदी करण्यात आली आहे. कर्नाटक राज्याची आणि बेळगाव जिल्हा प्रशासनाची महाराष्ट्र आणि मराठीविरोधी भूमिका समोर येत असल्याने मराठी भाषकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. या दडपशाहीच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. कर्नाटक सरकारची ही दडपशाही सहन केली जाणार नसल्याची भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडली.


पहिल्याच दिवशी अजितदादांनी अख्ख्या मंत्रिमंडळाला झापले!

पुणे येथील घडलेल्या घटनेनंतर शाई ही सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर आहे. विधिमंडळात ही शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. आज पहिल्या दिवशी विधिमंळात येणार्‍या सर्व व्यक्तीचे पेन तपासण्यात आले. शाईचे पेन नेण्यास बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, सीमाप्रश्नावरून गदारोळ झाल्याने विधिमंडळाचे अधिवेशनाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले आहे. कामकाज सुरू झाले तेव्हा महाराष्ट्र कर्नाटक सीमावदावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाल्याचे दिसून आले. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अख्ख्या मंत्रिमंडळालाच झापले. मंत्र्यांकडून नवे पायंडे पाडले जात असल्याने अजित पवार संतप्त झाले होते. काही मंत्री शर्टाच्या खिशाला पक्षाची चिन्हे असलेले बिल्ले लावून विधानसभेत आले होते. त्यामुळे अजित पवार भडकले. तुम्ही मंत्री आहात. मंत्र्यांनी असे पायंडे पाडू नका. नाही तर सभागृहात बेशिस्त वाढेल, असे अजित पवार म्हणाले.
————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!