पाट-कालव्यांच्या अर्धवट कामांमुळे सिंचनाचे स्वप्न फुललेच नाही; उलट शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान!
– अधिकारी, लोकप्रतिनिधी दोघांच्याही दुर्लक्षामुळे शेतकरीवर्गात पसरली संतापाची लाट!
चिखली (एकनाथ माळेकर) – दुष्काळी चिखली तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी खडकपूर्णा धरण बांधणारे माजी जलसंधारण व पाटबंधारे मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे भगिरथ ठरलेले भारतभाऊ बोंद्रे यांच्या स्वप्नांचा गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकारी व राजकीय नेत्यांकडून चुराडा होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. चिखली तालुक्यामध्ये रोहडा फाटा येथून कोलारा, गांगलगाव, कवठळ, अंत्री खेडेकर, मेरा बुद्रूक, असोला या भागात पाटपाणी नेण्यासाठी पाट-कालवा काढण्यात आलेला आहे. परंतु, या पाटाचे काम अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. पाटाअभावी या भागातील सिंचनाचे स्वप्न अधुरे राहात असून, हा पाट शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरलेला आहे. अपूर्ण कामे, लेव्हल नसणे, पाटरस्ते अर्धवट असणे, यामुळे शेतकर्यांच्या जमिनी चिभडल्या असून, शेतमाल नेण्याचा मोठा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक नुकसानींनादेखील सामोरे जावे लागत आहे. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व सिंदखेडराजा-देऊळगावराजाचे आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तातडीने या पाट-कालव्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी या गावांतून पुढे आली आहे.
खडकपूर्णा कालव्याद्वारे चिखली तालुक्यातील गावांना पाटाच्या पाण्याची शेतीसाठी व्यवस्था व्हावी, म्हणून माजी जलसंधारण मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांनी चिखली तालुक्याचे हरितक्रांतीचे स्वप्न पाहून जे नियोजन मंत्री असताना केले होते ते अजूनपर्यंत पूर्ण झालेले दिसून येत नाही. तालुक्यामध्ये रोहडा फाटा येथून कोलारा, गांगलगाव, कवठळ, अंत्री खेडेकर, मेरा बुद्रुक या भागात पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु सदर पाट-कालव्यांचे काम अपूर्ण असल्यामुळे शेतकर्याचे पाण्याचे स्वप्न हे अधुरे राहण्याची वेळ आली आहे. सदर पाटाचे लेव्हल नसल्यामुळे पावसाळ्यात पाटामध्ये पाणी साचून शेतकर्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पाटातील पाणी साचल्यामुळे शेती चिभडली होते, त्यामुळे शेतीचे उत्पन्न हे कमी आले, तसेच पाटाच्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे सोयाबीन काढत्या वेळेस सदर पाटाच्या रस्त्यावरून सोयाबीनचे वाहतूक करताना वाहने पलटी होऊन शेतीमालाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीला जबाबदार शासकीय अधिकारी आहेत. अंत्री खेडेकर, कवठळ पाट कितीतरी दिवसापासून खोदून ठेवलेला आहे. परंतु सदर पाटाचे काम हे अपूर्ण असल्यामुळे यावर्षीसुद्धा पाटाला पाणी येते की नाही अशी अवस्था तयार झाली आहे. पाट तयार झाल्यापासून मेरा, अंत्री खेडेकर मायनर-४ या पाटाला एकदा सुद्धा पाणी आले नाही. पाटाचा फायदा कमी आणि तोटा जास्त अशी परिस्थिती अंत्री खेडेकर, कवठळ, मायनर-४ वरील शेतकर्यांची झाली आहे. सदर पाटाची लेव्हल नसल्यामुळे व रस्त्याची अवस्था नसल्यामुळे जाण्या-येण्यासाठी व मालवाहतुकीसाठी शेतकर्यांना खूप मोठी अडचण जात आहे. परंतु पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांना फोन लावला असता, येतो, पाहतो, करतो अशी भूमिका घेतात. गावामध्ये येऊन कोणत्याही प्रकारची मीटिंग किंवा लोकांना यानंतर पाटाचे काय काम होईल, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे अंत्री खेडेकर, कवठळ येथील शेतकर्यांची पाटाचे पाण्याची अपेक्षा ही अपेक्षाच राहण्याची वेळ आली आहे.
या पाटाची लेव्हल खूप खोल असल्यामुळे या पाटांमध्ये पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून शेजारील शेतामधील सोयाबीनचे व इतर मालाचे खूप मोठे नुकसान झाले आहे, याबाबत संबंधित अधिकारी यांना विचारले असता, काम होणार आहे, काम दुसरीकडे चालू आहे, तिकडले झाले की इकडे करू, असे उत्तर देतात. त्यामुळे शेतकर्याचे समाधान होत नाही. पाटाचा फायदा आजपर्यंत या भागातील शेतकर्यांना झालेला नाही. मेरा, अंत्री खेडेकर, कवठळ विभागातील शेतीही खडकाळ असल्यामुळे व पाण्याचा या भागांमध्ये कोणताही स्रोत नसल्यामुळे विहीर, बोर यांना पाण्याची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे विहीर आणि बोरवेलचे पाणी लवकरच आटते. जर पाटाला पाणी आले तर विहीर आणि बोअरवेलची तसेच शेतकर्यांना पाणी घेण्यासाठी व्यवस्था होईल, व शेतकर्यांचे उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा मेरा, अंत्री खेडेकर येथील शेतकर्यांची आहे. परंतु संबंधित अधिकारी हे कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर देत नसल्यामुळे कवठळ, अंत्री खेडेकर, मेरा बुद्रुक येथील शेतकर्यांची पाटाचे शेतात येण्याची इच्छा पूर्ण होणार की स्वप्नच राहणार, अशी अवस्था तयार झाली आहे. संबंधित ठेकेदाराने थातूरमातूर काम करून भरपूर ठिकाणी अपूर्ण काम ठेवले आहे, तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष देऊन मेरा, अंत्री खेडेकर, कवठळ या भागातील पाट-कालव्यांची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अंत्री खेडेकर, कवठळ, असोला या भागातील शेतकरी मागणी करत आहेत.