सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उर्जित अवस्थेत आणण्यासाठी प्रशासक म्हणून काम करीत असताना शैलेश कोतमिरे यांनी आपला सहकारातील अनुभव पणाला लावला. त्यामुळेच आज बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे मत राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरीव प्रगतीस योगदान देवून आपला प्रशासकीय कार्यकाळ यशस्वी केल्याबद्दल राज्याचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन शहरातील शिवछत्रपती रंगभवन येथे करण्यात आले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते.
सहकार आयुक्त कवडे म्हणाले, कोतमिरे यांनी केलेल्या कामाचा तळमळाचा सत्कार झालाच पाहिजे. डीसीसी बँकेसाठी जे योगदान दिले आहे ते खूपच उल्लेखनीय आहे. त्याच्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. एक लीडर म्हणून काम त्यांनी गेल्या चार वर्ष दोन महिन्यांमध्ये केले आहे. ते काम पुढे बँकेच्या प्रत्येक कर्मचार्यांनी चालू ठेवणे गरजेचे आहे. कोतमिरे यांच्याप्रमाणे इतर अधिकारी यांनी काम केले तर बँकेची स्थिती चांगली राहू शकेल, या भावनेने काम केले पाहिजे. येणार्या प्रत्येक ग्राहकाला बँकेच्या सेवा चांगल्या व प्रामाणिकपणा, विश्वास वाटला पाहिजे, असे काम करणे गरजेचे आहे. प्रशासक असताना कोतमिरे यांनी सेंचुरी मारली असून आता मॅच जिंकायचे डीसीसी च्या सर्व कर्मचार्यांच्या हातात आहे. सध्याचा काळ हा बँकेसाठी आव्हानात्मक असून, त्यासाठी बदलत्या तंत्रज्ञान कर्मचार्यांनी आत्मसात केले पाहिजे असेही याप्रसंगी कवडे यांनी म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना कोतमिरे म्हणाले की, हा सत्कार माझा नसून सर्व कर्मचार्यांचा आहे. कारण त्यांच्या जीवावरच बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. या चार वर्षात काही कमवले असले तरी ते सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास आहे. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आणायला कर्मचार्यांचा वाटा असल्याचा मेसेज बाहेर जात होता. त्यामुळे इतर बँका डीसीसी बँकेकडे ठेवी ठेवण्यासाठी टाळत होत्या. अशा परिस्थितीमध्ये काम करणे खूपच कठीण होते. कारण बँकेमध्ये कर्ज वाटप करण्यासाठी एक रुपया देखील नव्हता. ज्यावेळी डीसीसी बँकेचा पदभार मी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून मागून घेतला होता. त्यामुळे अनेकांनी मला वेडा असल्याचे सांगितले. अरे बंद पडलेली बँक बाहेर चालवणे काय साधी गोष्ट असल्याचे म्हणाले होते. परंतु आपल्या जिल्ह्यामधील बँक ही आर्थिक डबघाईला आली असल्याचे समजल्यानंतर मला ते स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे माझ्याकडे बँक बाहेर काढण्यासाठी बँकेचे १२६४ कर्मचारी हे माझे बलस्थान होते. त्यामुळे हा जो सत्कार आयोजित करण्यात आला आहे, तो बँकेवर विश्वास ठेवून ज्या सर्वसामान्य नागरिक असून प्रतिकात्मक माझा आहे. थेट कर्जवाटप हे कवडे यांच्यामुळे सुरू केल्या गेले असून ते त्याची जनक आहेत, असेही कोतमिरे म्हणाले.
यावेळी प्रशासकीय अध्यक्ष तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, सदस्य तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके, किसन मोटे यांनी कोतमिरे यांनी केलेल्या कार्याचा आढावा वाचून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले. कर्मचार्यांच्या वतीने कोतमिरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. टाळ्यांचा कडकडाट आणि हलगीचा आवाजाने कोतमीरे भारावले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीसीसी बँकेचे सीईओ विलास देसाई यांनी केले. तर आभार आर. एन. जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी डीसीसी बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकत्वाची जबाबदारी कोतमिरे यांच्याकडे!
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पदभर जरी प्रशासक म्हणून कोतमिरे यांनी सोडला असला तरी, त्यांच्याकडे पालकत्त्वाची जबाबदारी देण्याची मागणी कर्मचारी केली. त्यानंतर राज्याचे अप्पर निबंधक अनिल कवडे यांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले.
——————