– २० तारखेला मतमोजणी, गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचे लक्ष
बुलडाणा जिल्ह्यात एकूण ८०.४७ टक्के मतदान; चिखली तालुक्यात ७९.७८ टक्के मतदान
बुलढाणा/मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २७९ ग्रामपंचायतींसाठीदेखील शांततेत मतदान पार पडले असून, जिल्ह्यातील एकूण ३ लाख ७७ हजार १२५ मतदारांपैकी ३ लाख ०३ हजार ४९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची अंतिम आकडेवारी ८०.४७ अशी असल्याची माहिती प्रशासकीय अधिकार्यांनी दिली आहे. या निवडणुकीसाठीही सुशिक्षित मतदार मोठ्या प्रमाणावर रविवारी मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, मतदानासाठी दिव्यांग, वयोवृद्ध मतदारदेखील मतदान केंद्रांवर पोहोचले होते. जिल्ह्यातील सुमारे ८५१ सरपंचपदाच्या उमेदवारांचे तर ३,४९० सदस्य पदाच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालेले आहे. तर चिखली तालुक्यात ७९.७८ टक्के इतके मतदान झाले असून, १२ हजार ८३७ स्त्रिया व १४ हजार २९६ पुरुष मतदारांनी मतदान केले होते. तालुक्यातून एकूण २७ हजार १३३ एकूण २३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदासाठी मतदान केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले. दुपारी ३.३० पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी ६७ टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी ३.३० वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत ग्रामस्थांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मोठ्या प्राणात मतदान केले.
बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील २७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीच्या माध्यमातून दोन हजार ३२५ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी ४ लाख ३ हजार ८९९ मतदार आहेत. विशेष बाब म्हणजे, यांपैकी ७३१ सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत, तर २१ ग्रामपंचायतींचे सरपंचदेखील बिनविरोध निवडून आलेले आहेत. सदस्य पदासाठी तीन हजार ४९० उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, तर सरपंचपदासाठी ८५१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले होते. या सर्वांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले आहे. अर्ज माघारीनंतर बहुतांश ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी, बुलढाणा तालुका १०, चिखली २३, देऊळगावराजा १७, सिंदखेडराजा २९, मेहकर ४७, लोणार ३९, खामगाव १६, शेगाव १०, जळगाव जामोद १८, संग्रामपूर १९, नांदुरा १३, मोताळा ११ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले.
बीड जिल्ह्यात बोगस मतदान उघडकीस
बीड जिल्ह्यातील पाटोदा गावातील एक मतदार दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्त असताना त्याच्या नावावर बोगस मतदान झाल्याचं उघड झालं आहे.