या सरकारचं काम कमी, रिकामे उद्योगच जास्त!
– सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
– उद्यापासून राज्य विधिमंडळाने नागपुरात हिवाळी अधिवेशन
नागपूर (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यात सत्तेवर आलेले शिंदे-फडणवीस सरकार हे कामं कमी आणि रिकामे उद्योगच जास्त करत आहे. आम्हाला चहापणाला उपस्थित रहा, असे सांगितले, मात्र ६ महिने सरकार सत्तेवर आले आहे. मात्र जनतेच्या अपेक्षा यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. अनेक मंत्री, आमदार महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. सीमा प्रश्नाबाबत देखील अजून पुरेशी उपाययोजना केलेली नाही. ८६५ गावांचा प्रश्न अजून कायम आहे. आहे ती गावे इतर ठिकाणी जाण्यासाठी ठराव करू लागली आहेत. असा प्रयत्न ६२ वर्षात कधीही झाला नव्हता. त्यावेळी पलीकडच्या राज्यांतील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक होती. मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे. उलट आत्ताचे मंत्री पुरेशी बाजूदेखील मांडू शकले नाहीत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागत, सरकारच्या आजच्या चहा-पानावर बहिष्कार टाकत असल्याची महाविकास आघाडीची भूमिका जाहीर केली. तसेच, हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याचे संकेत दिलेत.
उद्यापासून (१९ डिसेंबर) नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाची पूर्ण तयारी झाली आहे. दुसरीकडे आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. आज दुपारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चहापाण्यावर बहिष्कार घातल्याचे जाहीर केले. यावेळी अजित पवार म्हणाले की, हे अधिवेशन तीन आठवड्याचे घ्यावे अशी आमची मागणी आहे. सरकारकडून काम करण्याऐवजी नको ते उद्योग सुरु आहेत. ज्यांना वेगवेगळ्या शिष्यवृत्या मिळतात त्याचे पैसेदेखील वेळेवर जात नाही. अनेक संस्थांचे पैसे थकले आहेत. राज्यात मराठवाडा, विदर्भ कोकणला देखील मदत मिळाली पाहिजे. कर्ज काढण्याला विरोध नाही मात्र त्यातून सर्वांना न्याय मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे. विदर्भाचा अनुशेष अजुनही पुरेसा नाही. धान खरेदी तोंड बघून केली जाते, असा आरोपही पवारांनी केला. राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. लाखो कोटीची गुंतवणूक होणार होती. मात्र या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र मुकला आहे. विरोधाला विरोध करणारे आम्ही नाहीत. आम्ही चर्चेतून मार्ग काढणारी लोकं आहोत. आम्ही आमदाराचा निधी वाढवला होता. त्यांच्यात हिमंत असेल तर त्यांनी ७ कोटी निधी करावा आहे का हिंमत बघुयात, अशेही पवार यांनी ठणकावले.
सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्ताव मांडतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याला अजित पवार यांनी उत्तर देत, सीमावादावर प्रस्ताव मांडल्यास त्या प्रस्तावाला आम्ही पाठिंबा देऊ, असे अजित पवार यांनी जाहीर केले. उद्या सोमवार १९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. २९ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल. कोरोना संकटानंतरचे नागपूरमध्ये होणारे हे पहिल अधिवेशन आहे. त्यामुळे नागपूरमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. विरोधकांकडून महापुरुषांबाबत कथित अवमानकारक वक्तव्य, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, महाराष्ट्राच्या हातून गेलेले प्रकल्प, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयांमुळे राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चांगलंच वादळी होण्याची शक्यता आहे.
—————-