BULDHANAChikhali

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत विष्णूभगवान गाढेंसह हर्ष गाढेचे नेत्रदीपक यश

– हर्षने तीन किलोमीटरचे सागरी अंतर अवघ्या २८ मिनिटांत कापले
– विष्णूभगवान गाढे यांनीही राज्यस्तरावर पटकाविला नववा क्रमांक

मालवण, जि. सिंधुदुर्ग (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या चिवला बीचवर आयोजित दोन दिवशीय राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी विष्णूभगवान शंकर गाढे व त्यांचे चिरंजीव हर्ष गाढे यांनी नेत्रदीपक कामगिरी करत, बुलढाणा जिल्ह्याचे नाव रोशन केले. आज झालेल्या तीन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत विष्णूभगवान गाढे यांनी नववा क्रमांक पटकाविला तर कालच्या दोन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत हर्ष विष्णू गाढे याने खुल्या समुद्रात हे अंतर अवघ्या २८ मिनिटांत पार करून यश मिळवले होते.

१२ वी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा १७ व १८ डिसेंबरला चिवला बीच येथे मोठ्या प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेत २६ जिल्ह्यांतून सुमारे १५०० स्पर्धक सहभागी झाले होते. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दोन दिवसीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा थाटात पार पडला. या सागरी जलतरण स्पर्धेचे २००९ पासून आयोजन करण्यात येत आहे. चिवला बीच येथे होणारी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा संपूर्ण भारतातील एकमेव स्पर्धा असून, या स्पर्धेत २६ जिल्ह्यांतून ६ ते ७५ वयोगटातील स्पर्धक विविध १२ गटात सहभागी होतात.

तीन पिढ्या अर्थात मुलगा-मुलगी, आईवडील, आजी-आजोबा यांचा एकत्र सहभाग असणारी भारतातील ही एकमेव स्पर्धा ठरली आहे. तसेच, दिव्यांग बांधवांसाठी ही हक्काची स्पर्धा म्हणूनही ओळखली जाते. या स्पर्धेत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी (अंतर्गत लेखापरीक्षण) विष्णूभगवान शंकर गाढे हे चिरंजीव हर्ष गाढे याच्यासह सहभागी झाले होते. त्यांनी आज झालेल्या तीन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत नववा क्रमांक पटकावत विजय संपादन केला. तर काल दोन किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत हर्ष याने विजयश्री खेचली होती. उधाणलेल्या समुद्रात तीन सागरी मैल समुद्र स्पर्धेत भाग घेऊन पहिल्या १० मध्ये येणारे विष्णू गाढे व हर्ष गाढे यांच्यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या सन्मानात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!