कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – कोल्हापूर जिल्ह्यातील बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवर किटवाड (ता. चंदगड) येथील धबधब्यात बेळगावमधील ४ कॉलेज तरुणींचा सेल्फी काढताना पाय घसरून पडून मृत्यू झाला तर, एका तरुणीला वाचविण्यात यश आले आहे.
किटवाड (ता. चंदगड) येथे लघुपाटबंधारा धरण आहे. या ठिकाणी एक धबधब्याचे ठिकाण आहे. हे पिकनिक स्पॉट असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आज (दि.२६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेळगावहून ४० कॉलेज तरुणींचा एक ग्रुप किटवाड धबधबा येथे विकेंड साजरा करण्यासाठी आल्या होत्या. त्यातील काही ५ तरुणी सेल्फी काढण्यासाठी थांबल्या असता त्यांचा पाय घसरून त्या पाण्याच्या खोल खड्ड्यात पडल्या. घटनास्थळी किटवाड येथील महेश हेब्बाळकर, विजय लाड, आकाश पाटील या तरुणांनी ताबडतोब धाव घेतली, पण त्यांना एका तरुणीला वाचवण्यात यश आले तर अन्य चार तरुणींचा मृत्यू झाला. वाचविण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून, तिला बेळगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची चंदगड पोलिसात नोंद झाली आहे. उज्वल नगर येथील आशिया मुजावर (वय १७), अनगोळची कुडशिया पटेल (वय २०) आणि रुक्सार भिस्ती (वय २०), झटपट कॉलनीतील तस्मिया (वय २०) अशी बुडून मृत्यु झालेल्या तरुणींची नावे आहेत. या तरुणी मद्रासा शाळेत शिक्षण घेत होत्या.