रस्त्याच्या प्रश्नावर भाजपने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना धरले धारेवर!
कर्जत (प्रतिनीधी) : कर्जत शहरातून जाणार्या मुख्य रस्त्याचे काम का बंद केले आहे, असा जाब भाजपच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रशांत वाघचौरे यांना विचारला. रस्त्याचे कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजेत, अशा सूचना मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिलेल्या असताना मुद्दाम भाजपला बदनाम करण्याचे काम सध्या सुरु असून, सदर रस्त्याचे काम का बंद आहे, याचा लिखित खुलासा द्यावा, अशी मागणी करत सर्वांनीच कार्यालयात बैठा सत्याग्रह केला.
कर्जत शहरातून जाणार्या अमरापूर-भिगवण रस्त्याचे काम गेली काही महिन्यापासून बंद आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धूळ उडते आहे, सदर रस्त्याचे काम तातडीने करणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत काम रखडवत आहे. यामुळे या रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या व्यवसाईकाना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, यावर सदर चालू झालेले काम बंद पाडण्यात आले, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियात होऊ लागली आहे. यावर राष्ट्रवादी व भाजपचे कार्यकर्ते आरोप प्रत्यारोप करत होते, याप्रश्नावर विविध प्रसार माध्यमातुनही आवाज उठवला जात होता. दोन आमदार असून ही प्रश्न सुटत नसल्याबद्दल लोक नाराजी व्यक्त करत होते, मात्र उघडपणे कोणीही व्यक्त होत नव्हते, शहरामध्ये मात्र भाजपच्या एका नेत्याने सदर काम बंद पाडल्याची चर्चा सुरू झाली होती. याबाबत कुणकुण लागताच भाजपच्या नेत्यांनी एकत्र येत आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले व सहाय्यक अभियंता प्रशांत वाघचौरे यांना सदरचे काम का बंद आहे, याबाबत जाब विचारला असता सदरच्या रस्त्या वर नगर पंचायतच्या पाणी पुरवठयाच्या पाईपलाईन येत असून, त्या खोल खाली घेणे आवश्यक आहे, त्याचे ईस्टीमेट बनविले असून ते मंजुरीस पाठविले असल्याचे सांगितले. याशिवाय सध्या खडीही उपलब्ध होत नसल्याने काम बंद असल्याचे कारण दिले. यावर सदरच्या कारणामुळे काम बंद असल्याचे लेखी द्या, विनाकारण या कामामुळे भाजपाला बदनाम केले जात असल्याचे म्हटले. कोंभळी कर्जत रस्त्याचे काम ही महाविकास आघाडीच्या गलथान कारभरामुळे बंद होते सत्ता बदल होताच वन विभागाच्या परवानग्या मिळवून काम सुरू करण्यात आले.
या कामावर माजीमंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी स्वतः अधिकार्यांबरोबर भेट देऊन रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला राखण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या कामांंवर योग्य नियंत्रणच ठेवत नाहीत व संबंधित ठेकेदार ही योग्य प्रकारे काम करत नसल्याचा आरोप यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केला. भाजपाच्या वतीने दिलेल्या निवेदनात कर्जत शहरातील रस्ता तातडीने सुरू करून पूर्ण करावा अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. निवेदनावर शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, सचिन पोटरे, अल्लाउद्दीन काझी, सुनिल (काका) यादव, शेखर खरमरे, पप्पूशेठ धोदाड, राहुल निंबोरे, रवि कानडे, उमेश जपे, डॉ. संदिप बरबडे, भाऊसाहेब गावडे, राजेंद्र येवले, यश बोरा, रोहीत ढेरे, सुदर्शन लाढाणे, निलेश आगम, संजय जाधव, आदीच्या सह्या आहेत.