पुणे (युनूस खतीब) – मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे अजून जीवंत असून, ते कोमात गेले आहेत. तथापि, बुधवारी संध्याकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. त्यावर आता त्यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बुधवारी दुपारी ते कोमात गेले आणि तेव्हापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. पुढे काय करायचं हे सकाळी डॉक्टर ठरवतील. त्यांची प्रकृती सुधारतेय का, ते प्रतिसाद देत आहेत का, यावरून डॉक्टर पुढील निर्णय घेतील’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, सध्या विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. काही माध्यमांमधील वृत्त आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर गोखले यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे.
विक्रम गोखले हे सद्या कोमात आहेत. त्यांना डॉक्टरांनी डेड घोषित केलेले नाही. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागच्या १५ दिवसापासून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बुधवारी रात्री विक्रम गोखले यांचे निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या निधनाचे वृत्त फेटाळले आहे. त्या म्हणाल्यात, की ‘ते काल दुपारी कोमात गेले आणि त्यानंतर त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही. ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती सुधारतीये की खराब होतीये आणि ते उपचारांना कशाप्रकारे प्रतिसाद देतात यावर डॉक्टर आज सकाळी काय करायचं ते ठरवतील’, असे त्यांनी सांगितले. विक्रम गोखले ५ नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आहेत. ‘त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती पण प्रकृती पुन्हा खालावली. त्यांना हृदय आणि मूत्रपिंडासारख्या अनेक समस्या होत्या. सध्या त्यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत. त्यांनी पुढे सांगितलं की, त्यांचे पती ८२ वर्षांचे नसून ७७ वर्षांचे आहेत. ‘सॅन प्रâान्सिकोहून माझी मुलगी आली आहे. दुसरी इथे पुण्यात आली आहे, ती मुंबईत राहते.’ विक्रम गोखले हे अजूनही गंभीर आहेत आणि लाइफ सपोर्टवर आहेत, त्यांचे अद्याप निधन झाले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा.’
गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. रात्री उशीरा त्यांची तब्येत खालवली असल्याचे वृत्तही आले. काही बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटवरून प्रसारमाध्यमांनी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त दिलं. दरम्यान, सोशल मीडियावरील चर्चेनंतर अखेर कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयीचे महत्त्वाचे अपडेट्स मेडिकल बुलेटिनद्वारे देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. उपचाराला म्हणावा तसा प्रतिसाद त्यांचं शरीर देत नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत, तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाही, असं गोखले यांचे फॅमिली फ्रेंड राजेश दामले म्हणाले.
विक्रम गोखले यांचा अल्पपरिचय
विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी झाला. त्यांनी चित्रपट मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले आहे. गोखले यांना चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.
—————-