कोल्हापुरात गायरान अतिक्रमणाचा प्रश्न पेटला; अतिक्रमणधारक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले!
कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – कोल्हापूरमध्ये गायरान अतिक्रमण काढण्याविरोधात सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली, दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. अतिक्रमण काढायला आले, तर गावच्या वेशीवरच त्यांना थांबवा. कोणालाही आत येऊ देऊ नका, असा सल्ला सतेज पाटील यांनी अतिक्रमणधारकांना दिला.
आमदार सतेज पाटील म्हणाले की, ‘हे अतिक्रमण नाही , ही आमच्या हक्काची जागा आहे. प्रशासनाला आमची विनंती आहे की, जबरदस्ती करू नका. जबरदस्ती केल्यास आम्ही गप्प बसणार नाही. शहरी भागाला वेगळा आणि ग्रामीण भागाला वेगळा न्याय का? राज्य सरकारने लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घ्यावी. नाही तर काही चुकीचं झाल तर त्याला शासन जबाबदार राहील.’ त्यांनी मोर्चाला संबोधित करताना असेही सांगितले की, ‘विकास आराखडा तयार करताना शहरातील अतिक्रमण नियमित होतात. गावठाण हद्दवाढ केल्यास अतिक्रमणाचा प्रश्न संपेल. विभागीय आराखड्यानुसार हे अतिक्रमण रेसिडेन्शियल करा. पण , हे सर्व करताना तुमची इच्छा असली पाहिजे.’
माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटल्याचे म्हंटले आहे. या निर्णयाने किती अतिक्रमण काढावी लागतील, हे न्यायालयच्या निदर्शनास आलेलं नसावं. असेही ते म्हणाले. अतिक्रमण कारवाई थांबली नाही, तर कोल्हापूर जिल्हा बंद ठेवावा लागेल. असा इशारदेखील त्यांनी दिला. राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांनी शासनाला कळवलं पाहिजे आम्ही हतबल आहोत. राज्य शासन गप्प बसून आहे. आतापर्यंत पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. अधिकार्यांना प्रसंगी नोकर्यांचे राजीनामे द्या. पण अतिक्रमण काढायला येऊ नका. असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
सर्वात जास्त अतिक्रमणधारक हे करवीर तालुक्यात आहेत. ग्रामपंचायतीच्यावतीने अतिक्रमण कायमस्वरुपी व्हावे. यासाठी जिल्हा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. होणार्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडून अतिक्रमण कायमस्वरुपी करून घ्या. या सर्व पक्षीय मोर्चाच्या निमित्ताने मी आपणास ग्वाही देतो की, ज्या पद्धतीने टोल हद्दपार केला, कोल्हापूर शहर हद्दवाढ विरोधात भूमिका मांडली. त्याचपद्धतीने हे गायरान अतिक्रमणविरोधी घेतलेला निर्णय हाणून पाडू . अशी ग्वाही चंद्रदीप नरके यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी. अतिक्रमणे तात्काळ काढू नयेत. अशी मागणी सर्व पक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आर.के. पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, आर पी आय चे कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक अतिक्रमणधारक आणि महिला देखील मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.
—————-