KOLHAPURPachhim Maharashtra

सात महिन्याचे घरभाडे थकले, घरमालकाने हतबल ब्राम्हण कुटुंबाला घराबाहेर काढले, सामानही केले जप्त!

– वडणगे येथील हृदयद्रावक घटना, निराधार कुटुंबाच्या मदतीसाठी धावली वडणगे कृती समिती

कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – करवीर काशी वडणगे येथील पंचगंगा तीरावरील शंकर-पार्वती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाशिवरात्रीचे वडणगे गाव आणि या गावातील ब्राम्हण गुरुजी यांचे कुटुंब सुभाष इनामदार (भटजी), त्यांच्या पत्नी सौ. आरती इनामदार, मुलगा सुरज इनामदार आणि मुलगी शिल्पा इनामदार हे कुटुंब गेली २० वर्षे वडणगे गावात राहतात. हे कुटुंब मुळचे सांगली जिल्हातील कवटे एकंद या गावचे आहेत. ते गावात आल्यापासून आपल्या कुटुंबासमवेत भाड्याच्या खोलीत राहूनच आपला चरितार्थ चालवत आहेत. धार्मिक पूजा, श्राद्ध कार्य करणे हा त्यांचा व्यवसाय आहे. परंतु, अत्यल्प उत्पन्न व घरात असलेली अठराविशे दरिद्र्य पाहाता, सात महिन्यांपासून घरभाडे थकले. त्यामुळे घरमालकाने सामान जप्त करून या असह्य कुटुंबाला घराबाहेर काढले. मुलगा कुठेतरी थैली उचलून निघून गेला. ७३ वर्षीय वयोवृद्ध बाप, तरुण मुलीसह वृद्ध पत्नीला घेऊन मंदिरात आश्रयाला गेला. त्यांची ही हृदयद्रावक परिस्थिती वडणगे कृती समितीला कळल्यानंतर मदतीचे हात धावून आले. तात्पुरती सोय झाली असली तरी, या कुटुंबाला कायमस्वरूपी आधाराची गरज निर्माण झालेली आहे.

या इनामदार कुटुंबातील कर्ता मुलगा ४० वर्षाचा असून, शिक्षण ९ वीपर्यंत झाले असल्याने नोकरीसाठी तो एका बेकरीमध्ये तूटपुंज्या पगारावर काम करीत आहे. तो आपला पारंपरिक व्यवसाय धार्मिक पूजा वैगरे करीत नाही. त्यास येतही नाही. तसेच घरी एक मुलगीही आहे. तिचे वय ३७ वर्षे आहे. ती थोडी मतिमंद व अपंग आहे. या परिस्थितीत हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. गुरुवार, दि. ३ नोव्हेंबररोजी सकाळी ११ वाजता इनामदार कुटुंबास सात महिन्याचे घरभाडे न दिल्याच्या कारणास्तव घरमालकाने त्यांना घरातून बाहेर काढले आणि त्यांचे घरातील काही साहित्य भाड्यापोटी आपल्याच ताब्यात ठेऊन घेतले. जोपर्यंत घरभाडे देत नाही, तोपर्यंत साहित्य देणार नाही असे सांगितले. भटजींचा मुलगा हे सर्व पाहून आपली बॅग घेऊन घरातून निघून गेला. हताश झालेले हे दाम्पत्य मुलीला घेऊन गावाचे ग्रामदैवत आई पार्वतीदेवीच्या मंदिरात येऊन थांबले. मंदिरातील पुजारी मनोज गुरव यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून ही बाब वडणगे कृती समितीचे कार्यकर्ते दिलीप विष्णू प्रभावळे यांच्या निदर्शनास आणून दिली. कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित घरमालकास फोन केला असता, घरमालकाने त्यांना ठेऊन घेण्यास नकार दर्शिवला. त्याच क्षणी कृती समितीच्यावतीने भटजी कुटुंबास मदतीचे आवाहन करण्यात आले. ग्रामस्थांनी फुल न फुलाची पाकळी म्हणून काही जणांनी खारीचा वाटा उचलला. पवन ठमके यांनी एक महिना पुरेल इतका किराणा सामानाचे किट भटजींना मदत म्हणून दिले.

गावातील ‘दिव्या मेस’चे मालक केतन पोवार यांनी या कुटुंबास दोन वेळचे तिघांचे जेवण देण्याची व्यवस्था केली. तर अरुण नांगरे, मोहसीन मुल्ला, महेश बुटाले, महादेव नरके, अमर नरके, रवींद्र मोरे, विजय पोवार, भैरु नाईक, संजय कांबळे, शिवाजी लांडगे, उषा जाधव पुणे, प्रकाश पाटील, दिगंबर इंगळे, विशाल नांगरे यांनी आर्थिक मदत केली आहे. दुसरीकडे, चांगली खोली मिळेपर्यंत सासणे मळा येथे शेलार-कचरे या कुटुंबियांनी त्यांना आसरा दिला. दोन दिवसांनी या कुटुंबाला साखळकर गल्ली येथील ‘शिव-पार्वती’ मंडळाच्या खोली येथे सोय करण्याचे ठरविले. यांची सोय मंडळाचे कार्यकर्ते अमित साखळकर आणि संजय साखळकर यांनी केली. गावातील ‘डी मेम्बर’चे कार्यकर्ते कुणाल शेलार व त्यांच्या अन्य कार्यकर्त्यांनी मिळून इनामदार यांचे भाड्याच्या घरातील साहित्य शिव-पार्वती तरुण मंडळाच्या खोलीत आणून दिले. इनामदार भटजी यांचे वय ७३ आहे. कोरोना काळापासून त्यांची तब्येत खालावली आहे. वयोमानानुसार तब्येत त्यांना साथ देत नसल्याने ते चिडचिड करतात, सतत बडबड करत असतात, बायको आणि मुलीला शिवीगाळ-मारहाणही करत असतात. इनामदार भटजी यांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाची पोस्ट वाचून लोकांनी प्रतिसाद देत मदत गोळा करण्यात आली. काहींनी पैशाच्या स्वरूपात तर काहींनी धान्याच्या स्वरूपात मदत केली आहे.

कोल्हापूर ‘ब्राम्हण समाज’ येथील पदाधिकारी शामराव जोशी, संजय जोशी, प्रकाश गुळवणी आणि शैलेश बांदेकर यांनी कृती-समितीच्या कार्यकर्त्यासमवेत भटजी कुटुंबाची भेट घेऊन आर्थिक मदत केली. तसेच विचारपूस केली. त्यावेळी त्यांच्या हे लक्षात आले की, या कुटुंबाकडे कोणतेच आर्थिक उत्पन्नाचे साधन नाही. यावर त्यांनी विचार केला की या कुटुंबास मासिक पेन्शनची सोय व घराची सोय करून देता येते का ते पाहू? इनामदर भटजींना चांगल्या उपचाराची आवश्यकता असल्याचे कृती समितीच्यावतीने त्यांना सांगण्यात आले. त्यांनी कोल्हापुरातील नामवंत डॉक्टरांशी संपर्क करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येतील, असे सांगितले आहे. वडणगे कृती समितीच्यावतीने दिलीप प्रभावळे यांनी ब्राम्हण समाजाकडे एवढीच मागणी आहे की, त्यांच्या घराचा प्रश्न कायम स्वरूपी लवकरात लवकर मिटवावा व त्यांना मासिक पेन्शन योजना सुरु करावी, यामुळे त्यांच्या जीवनाचा खडतर प्रवास संपेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!