संवेदनशीलता व वंचित घटकांना सक्षम करणे ही दत्ता मेघेंची व्यापक भूमिका – अर्जुन मेघे
नवी मुंबई (प्रतिनिधी) – संवेदनशीलता व सर्वसामान्य, वंचित घटकाला सक्षम करणे ही दत्ता मेघेची व्यापक भूमिका नेहमीच राहिलीय. व्यक्तिगत हिताचा त्यांनी कधी विचार केला नाही आणि करतही नाही, ही दत्ता मेघे यांच्याकडून मला मिळालेली मोठी शिकवण आहे, असे प्रतिपादन श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल शिक्षण संस्थेचे सचिव अर्जुन मेघे यांनी केले.
श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालय व दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दत्ताजी मेघे यांच्या जन्मोत्सवानिमित्त्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पितृछत्र, मातृछत्र हरपलेल्या मुलींना व अनाथ मुलींना शैक्षणिक, आरोग्य व स्वच्छतेचे साहित्य वाटप करण्यात आले. या मुलींशी दत्ता मेघे यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत आस्थेने व मायेने चौकशी केली, या प्रसंगी मुलींनी विशेष स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
रस्ते, वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशान्वये राज्य शासन व केंद्र शासनाच्या ‘अपघात शुन्य ‘या धोरणाबाबत वाहन चालक व सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यवाही, जनजागृती करण्यासाठी ११ नोव्हेंबर पासून राज्यशासनाने पाठीमागे बसलेल्या सर्व सहप्रवाशांना सीटबेल्ट लावणे सक्तीचे केले असून, याबाबत प्रबोधनात्मक व स्वयंजाणीव होण्यासाठी वाहन चालकांना व्यक्तिगत व सामान्य जनतेला ‘मी जबाबदारीने वाहन चालवणार’ हा संदेश देणार्या माध्यमाचे जनजागृती करण्यासाठी अनावरण अर्जुन मेघे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या विश्वस्त शमा मेघे यांनी महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय मेघे साहेब शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवा, युवतींना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा, अशी भावनिक साद व्यक्त केली.
श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल शिक्षण संस्थेने गेल्या ३५ वर्षांपासून बहुजन, पीडित, गरीब, कष्टकरी व सर्व सामान्य वर्गास शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून शिक्षितच नव्हे, तर सुसंस्कृत बनविण्याचे कार्य केले हे मोलाचे योगदान आहे. याचे श्रेय विद्यमान अध्यक्ष दत्ता मेघे आहे, असे उद्गार दत्ता मेघे वर्ल्ड अकॅडमीचे प्राचार्य राजीव कुमार यांनी व्यक्त केले. दत्ता मेघे यांनी ऐरोलीच्या शैक्षणिक क्षेत्राच्या विकासाचा पाया रचला असून, नवी मुंबईच्या शैक्षणिक विकासाच्या योगदानात दत्ता मेघेची श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल शिक्षण संस्था हे एक महत्त्वाचे समीकरण जुळलेले आहे. या जन्मोत्सवाच्या आयोजनासाठी संस्थेच्या सर्व विश्वस्तांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले असे प्रतिक्रिया संस्थेचे प्रशासकीय अधिकारी संतोष राजपूत यांनी दिली. दत्ता मेघे यांच्या जन्मोत्सवाच्या प्रसंगी नवी मुंबई स्तरावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी दंत रोग निदान शिबिर, विद्यार्थी व पालकांसाठी विविध स्पर्धा, सुंदर शालेय परिसरासाठी फुलांची रोपांचे रोपन, आश्रमातील मुलींना शैक्षणिक, स्वच्छतेचे व आरोग्य विषयक साहित्य वाटप तसेच आश्रमातील मुलींना अन्नदान व वाहक चालकांना अपघात नियंत्रणासाठी स्वयं घोषित संदेशवहन फलकाचे अनावरण तसेच आजी माजी विद्यार्थ्यांकडून व संस्थेच्या सर्व कर्मचार्यांकडून दत्ता मेघेंना अनोख्या शुभेच्छा देण्यात येणार आहे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अव्यक्त भावनांना मोकळी वाट’ हा शुभेच्छापत्रांचा उपक्रम असे विविध उपक्रम संपन्न झाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वनाथ सोनसुरकर, समाधान रोकडे, सिद्धेश बागवे, किरण निकम, हितेश जाधव, दर्शना पांडे व अभय देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली.