– फाशी झाली तरी चालेल, पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही – आ. आव्हाड
– तुमचं माझं नातं काय, जय भवानी जय शिवराय.! जामीन मिळताच आव्हाडांच्या घोषणांनी ठाणे कोर्ट परिसर दुमदुमला!
ठाणे (जिल्हा प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखविणार्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाला विरोध केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह १२ जणांना शुक्रवारी ठाणे पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यामुळे आव्हाड यांच्यासह १२ जणांची सुटका झाली आहे. आव्हाडांना जामीन मंजूर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. तर आव्हाड कोर्टाबाहेर येताच त्यांच्या गाडीवर फुलांची उधळण करण्यात आली. गुलाब पुष्पाच्या पाकळ्यांच्या वर्षावात आव्हाडांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. कार्यकर्त्यांच्या उत्साहात आव्हाडही सामील झाले. त्यांनीही कार्यकर्त्यांच्या घोषणबाजीत सूर मिसळला. ‘तुमचं माझं नातं काय? जय भवानी जय शिवराय… जय जय जय जय जय भीम…’, अशा गगनभेदी घोषणांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा परिसर दुमदुमून गेला. दरम्यान, फाशी झाली तरी चालेल, पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. तुरुंगातून जामिनावर बाहेर येताच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. माझ्या अटकेवेळी पोलिसांची हतबलता दिसून आली. शिवाजीराजेंची होणारी बदनामी रोखण्याचा आम्ही गुन्हा केला का, असा सवाल आव्हाड यांनी केला.
आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. आज सकाळी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड आणि ११ कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टामध्ये हजर केले होते. आव्हाड यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे, यामध्ये महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येत होत्या. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. तसेच पोलिसांकडून कोर्टाच्या दिशेने येणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आले होते.
कोर्टात दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तिवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आव्हाड यांचा जामिनासाठी मार्ग मोकळा झाला होता. न्यायाधीश बी एस पाल यांनी अटी शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. तपासात सहकार्य करणे, तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीस जाणे, साक्षीदारांशी संपर्क करु नये, तपासात बाधा आणू नये अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जामिनावर बाहेर येताच आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला हर हर महादेव चित्रपटात दाखल्याप्रमाणे मारलं होत का? शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची लढाई झाली होती का? अफजल खानाची संपूर्ण माहिती शिवाजी महाराजांना, बाजीप्रभू देशपांडेंना कोणी दिली होती का? असे प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आला. मराठ्यांचे पाटील बायकांचा बाजार करतात, असा दावा करण्यात आला. मुद्दामहून मराठ्याचे शौर्य कमी करण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आल्याचेही आव्हाड यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
—————-