– खुनाच्या प्रकरणात अपघाताची नोंद करणे भोवले, दोन लाखाचा दंड, खातेनिहाय चौकशीचे आदेश
लोणार (तालुका प्रतिनिधी) – खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करत, वडिलांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष केल्याने लोणारचे ठाणेदार प्रदीप खंडू ठाकूर, हेडकॉन्स्टेबल गजानन धोंडगे यांनी तक्रारदारास दोन लाख रुपये भरपाई द्यावी व या दोघांचीही खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, असे आदेश राज्य मानवाधिकार आयोगाने दिला आहे. या आदेशाने बुलढाण्याच्या पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील अभिमन्यू जाधव यांचा मुलगा पवन जाधव (वय २२) हा गावातीलच मुकेश पांडुरंग जाधव याच्यासोबत बाहेर गेला होता. त्यांच्यासोबत दत्ता नामदेव डफाडे (कुंडलस) हादेखील होता. २ मार्चला पवनचा अपघाती मृत्यू झाल्याचे या दोघांनी सांगितले. याबाबत अर्जदार अभिमन्यू जाधव यांनी ५ मार्च २०२२ रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असता, पोलिसांनी गुन्हा दाखल न करता ती चौकशीत ठेवली. त्यामुळे अभिमन्यू जाधव यांनी लोणार येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली. तसेच, मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार नोंदवली. न्यायालयाने कलम १५६ अंतर्गत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार, २५ जून २०२२ रोजी अखेर खुनाचा गुन्हा दाखल केला.
दुसरीकडे, याप्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाने मेहकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार मेहकर एसडीपीओ यांनी आपला अहवाल सादर केला. त्यात ठाणेदार ठाकूर व हेड कॉन्स्टेबल धोंडगे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात या दोघांचीही बाजू आयोगाने ऐकली. त्यानंतर या दोघांनाही दोन लाख रुपयांचा दंड, दोघांची खातेनिहाय चौकशी, आणि पुढील कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या सचिवांना राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष के. के. तातेड यांनी काल १० नोव्हेंबररोजी दिले आहेत. आयोगाच्या या दणक्याने कर्तव्यात कसूर करणार्या पोलिस अधिकार्यांची घाबरगुंडी वळली असून, पोलिस वर्तुळात खळबळ उडालेली आहे.
—————