देशात प्रचंड बेराेजगारी असताना केवळ अमित शाह यांच्याच मुलाला नोकरी; कन्हैय्या कुमार यांनी डागले टीकास्त्र
राहुल गांधींवर विश्वास असल्यानेच पदयात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद : कन्हैया कुमार
नांदेड/हिंगाेली (जिल्हा प्रतिनिधी) – विविधतेत एकता ही या देशाची ओळख असताना ही ओळख पुसण्याचे काम मागील काही वर्षांपासून केले जात आहे. द्वेषाचे बिज पेरून समाजा-समाजाला, जाती-धर्माला एकमेकांविरोधात लढवून भाजपा आपली राजकीय पोळी भाजत आहे. देशात महागाई, बेरोजगारीची समस्या मोठी असताना केंद्रातील भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. अशा विपरीत परिस्थितीत भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्यास निघालेल्या राहुलजी गांधी यांच्याकडून लोकांच्या आशा, अपेक्षा व विश्वास असल्याने प्रचंड मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत, असे काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना कन्हैयाकुमार यांनी भारत जोडो यात्रेचा उद्देश स्पष्ट केला व देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, पदयात्रेत सहभागी झालेले लोक त्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन जिवनातील समस्यांवर बोलत आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळत नाही, शेतमालाला भाव मिळत नाही, उच्च शिक्षण घेऊनही नोकरी लागत नाही अशी तरुणांची अवस्था आहे मात्र अमित शाह यांच्या मुलाला मात्र नोकरी लागते तेही नियम बदलून याचा संताप तरुणांमध्ये आहे. आपली स्वप्नं भाजपा सरकार धुळीस मिळवत आहे हे त्यांचे दुःख आहे. महागाईने महिलांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. जिवघेण्या महागाईत जगणे मुश्कील झाले आहे. जनतेच्या या समस्या असताना केंद्रातील भाजपा सरकार मात्र या मुळ मुद्द्यांना हात घालत नाही. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ते इतर मुद्द्यांना महत्व देत आहेत. सरकार जनतेचे ऐकत नाही पण राहुलजी गांधी मात्र जनतेच्या समस्या, वेदना, दुःख ऐकून घेत आहेत. आपले दुःख ऐकण्यासाठी आपल्याकडे कोणीतरी आले आहे ही भावनाच जनतेला आपलीशी वाटत आहे.
भारत जोडो यात्रेचा उद्देश पवित्र व स्वच्छ असून देश तोडणाऱ्या शक्तींना देश जोडण्यातून उत्तर दिले जात आहे आणि याकामी जनतेचे मोठे समर्थन लाभत आहे. या पदयात्रेचा उद्देश केवळ निवडणुका जिंकणे नाही तर जनतेला विश्वास देण्याचा आहे, देशातील एकोपा कायम ठेवणे आहे. आपापसात भांडण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीसह आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याची लढाई लढली पाहिजे हे जनतेला आता समजले आहे, असेही कन्हैयाकुमार म्हणाले. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यात भारत जोडो यात्रेचे भव्यदिव्य स्वागत
वारंगा, (जिल्हा हिंगोली) – भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले. हिंगोली जिल्ह्यातील चोरंबा फाटा येथून ते पदयात्रेत सहभागी झाले. त्यांच्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सचिन अहिर, नांदेडचे संपर्क प्रमुख, माजी खासदार सुभाष वानखेडे पदयात्रेत सुमारे पाच किलोमीटर चालले. यावेळी राहुलजी आणि आदित्य यांच्यात चर्चा रंगली होती. सुमारे सहाच्या सुमारास आदित्य ठाकरे पदयात्रेतून बाहेर पडले. संध्याकाळी ७ वाजता वरंगा फाट्या येथे स्थानिकांशी राहुलजी गांधी यांनी संवाद साधला. यावेळी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
हिंगोली जिल्ह्यात पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. एकाचवेळी असंख्य मुखातून ‘भारत जोडो’च्या घोषणा, हातात तिरंगी झेंडे…कौशल्याने कोरलेल्या मोठमोठ्या आकर्षक रांगोळ्या….आणि राहुलजी गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी खिळलेले हजारो डोळे…यात्रेतील हजारो नागरिकांच्या विराट जनसगराच्या साक्षीने सायंकाळी 4.14 वाजता पदयात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. यावेळी शेकडो शिवसैनिक हातात मशाली घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. भल्या मोठ्या प्रवेशद्वारच्या मागेपुढे सजलेल्या रांगोळ्या, वसुदेवांचे नृत्य, भवानीचे गोंधळी, धनगरी ढोलपथक, महिला झांजपथक आणि डौलात चालणाऱ्या हत्तीची सजवलेली अंबारी….चोरंबा फाटा येथून राहुलजी गांधी आणि आदित्य ठाकरे यांचे भव्य आणि दिमाखात स्वागत झाले. आमचे दुःख, आमचे कष्ट, आमची कैफियत ऐकायला कोणीतरी येत आहे याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यांवरून ओसंडून वाहत होता. मोठ्या उत्साहात प्रचंड गर्दी पुढे पुढे सरकत होती. प्रचंड गर्दीत आणि गर्दीतून येणाऱ्या काही मोजक्या लोकांना सहजपणे भेटत, त्यांचे म्हणणे ऐकून घेत, कोणाशी फुटबाल खेळत, तर कोणाकडून मिळालेली काठी आणि घोगंड्याची प्रेमळ भेट स्वीकारत…राहुल गांधीची ऐतिहासिक पदयात्रा आज पाचव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील वारंगा येथे सातच्या सुमारास दाखल झाली. चौक सभा झाल्यानंतर पदयात्रा विश्रांतीसाठी थांबली.