अंगणवाडी सेविकांना 5 हजार तर मदतनिसांना 3 हजारांची पगारवाढ
- राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची पूर्तता
मुंबई (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका आणि महिला मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. सध्या सेविकांना दहा हजार रुपये, तर मदतनीसांना पाच हजार रुपये मानधन दिले जाते. नव्या निर्णयानुसार सेविकांना पाच हजारांची आणि मदतनीसांना तीन हजार रुपयांची वाढ दिली जाणार आहे.
यापूर्वी अंगणवाडी सेविकांचे मानधन तीन हजार रुपयांनी वाढविण्यात आले होते. यावेळी त्यात पाच हजारांची वाढ करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. सोबतच कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8 हजार रुपये मानधनासह प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. तसेच अनुकंपा धोरणही लागू करण्यात येणार आहे. ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते. त्यात आता ५ हजार अधिक मिळणार आहेत. मागच्या वेळेस ३ हजार वाढवले होते. मात्र, आता पाच हजार वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे.