मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची मुसंडी!
- 10 पैकी 7 जागांवर दणदणीत विजय!
– अभाविपला धूळ चारल्यात जमा, विद्यार्थ्यांचा एकच जल्लोष
मुंबई (प्रतिनिधी) – मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा वरचष्मा दिसून आला असून, 10 पैकी 7 जागांवर युवासेनेचे उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे. सिनेट निवडणुका पुढे ढकलण्याची खेळीवर सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालयीन लढाई खेळली गेली. कोर्टाने कान टोचल्यानंतर ही निवडणूक तातडीने घेण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांकरिता २४ सप्टेंबर २०२४ रोजी मतदान झाले होते. सध्या मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत झालेली आहे.
राखीव गटातील युवासेनेचे 7 उमेदवार विजयी ठरले आहेत. ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारली असून, आता अजून किती जागा आदित्य सेना खिशात घालते, याचे चित्र लगेच समोर येईल. तर दुसरीकडे खुल्या गटातीलही युवासेनेचे 3 उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आदित्य सेनेने या निवडणुकीत विरोधकांना धूळ चारल्याची जोरदार चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली होती. मतदानाच्या आधी एक दिवस निवडणूक स्थगित केल्याने न्यायालायने मुंबई विद्यापीठाला फटकारले होते. त्यानंतर लगेचच मंगळवारी २४ सप्टेंबररोजी मतदान घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्याआधारे मंगळवारी या निवडणुकीसाठी मतदान झाले. एकूण १० जागांसाठी ५५ टक्के मतदान झाले. यामध्ये पाच जागा खुल्या प्रवर्गातील तर पाच राखीव प्रवार्गातील आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राखीव पाचही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. ओबीसी गटातून मयुर पांचाळ, शेड्युल्ड ट्राईब गटातून धनराज कोचाडे, महिला गटातून स्नेहा गवळी, शेड्युल्ड कास्ट गटातून शीतल शेठ, एनटी गटातून शशिकांत झोरे या पाच उमेदवारांनी जवळपास पाच-पाच हजार मते घेतली आहेत. तर प्रतिस्पर्धी अभाविप यांच्या उमेदवारांनी ८०० ते १००० मते घेतली आहेत, अशी माहिती वरूण सरदेसाई यांनी दिली आहे.