साखरखेर्डा (अशोक इंगळे) – घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणातून पतीने पत्नीवर चक्क धारदार शस्त्राने वार करुन ठार मारल्याची घटना लोणी येथे आज, दि. २७ सप्टेंबररोजी दुपारी घडली. पोलिसांनी पतीस ताब्यात घेतले आहे. या घटनेने लव्हाळा परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
लोणी (लव्हाळा) येथील नंदकिशोर देशमुख (इंगळे) आणि पत्नी प्रगती नंदकिशोर देशमुख हे दोघे राहातं होते. त्यांना दोन मुले आहेत. दि. २७ सप्टेंबररोजी किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद टोकाला जाऊन नंदकिशोर देशमुख यांने धारदार शस्त्राने वार करुन प्रगती हिला ठार मारले. ही वार्ता गावात पसरताच पोलीस पाटील यांनी उपरोक्त घटनेची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पती नंदकिशोर देशमुख यास ताब्यात घेतले. मृतक प्रगती नंदकिशोर देशमुख हिचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतकाच्या नातेवाईकांना साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तंक्रार देण्यासाठी बोलावले असून, त्यांच्या तंक्रारीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सांगितले.