गायत्री शिंगणे यांनी घेतली शरद पवार, सुप्रिया सुळेंची भेट!
- उमेदवारीबाबत अद्याप अनिश्चितता?; पवारांच्या मनात नेमके काय?
– पवारांचा उमेदवार कोण?; गायत्री की डॉ. राजेंद्र शिंगणे?
मुंबई/साखरखेर्डा (अशोक इंगळे) – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवार व पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांची सिंदखेडराजा मतदारसंघातून पक्षाच्या इच्छूक युवानेत्या तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्षा कु. गायत्री शिंगणे यांनी काल भेट घेऊन आपल्या कामाचा अहवाल या नेत्यांना सादर केला. यावेळी पवारांनी वडिलकीच्या नात्याने त्यांना अनेक राजकीय सल्ले देऊन मार्गदर्शन केले, तथापि, सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातून ठामपणे उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे गायत्री शिंगणेंना पवारांना कामाला लावले असले तरी, या मतदारसंघातून पवारांच्या मनात नेमका उमेदवार कोण? हा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे परतीसाठी पवारांचे दरवाजे ठोठावत असल्याचीही चर्चा असल्याने शरद पवारदेखील सावध खेळी खेळणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. या मतदारसंघातील जातीय समिकरणे व निवडून येण्याची क्षमता या बाबी तपासूनच पवार आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.
सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघातून कु. गायत्री शिंगणे यांनी त्यांचे काका व विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरोधात शंख फुंकला आहे. या काका-पुतणीत या मतदारसंघात लढत होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने शरद पवार यांनी गायत्री यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु, जोपर्यंत पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत शरद पवारांच्या निर्णयाचे काही खरे नसते! गायत्री शिंगणे यांनी काल मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेतली व या दोघांनाही आपला कार्यअहवाल सुपूर्त केला. यावेळी तब्बल दोन तास शरद पवार व सुप्रिया सुळे या गायत्री शिंगणे यांना मार्गदर्शन व सिंदखेडराजा मतदारसंघाचा त्यांच्याकडून आढावा घेत होते. या भेटीतून गायत्री या चांगल्याच प्रभावित झाल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून आले. तथापि, विश्वासनीय सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांनी गायत्री यांना उमेदवारीबाबत ठोस शब्द देण्याचे टाळले आहे. मतदारसंघात काम सुरू करून कामावर फोकस ठेवण्याचा सल्ला दिला असला तरी; उमेदवारी मिळेलच, याबाबत पवारांनी बोलणे टाळले. त्यामुळे गायत्री शिंगणे या पक्षाच्या उमेदवार राहू शकतात. परंतु, राहतीलच याची काही खात्री तूर्त तरी नाही, असे राजकीय सूत्रांनी सांगितले.
सिंदखेडराजाचे विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हेदेखील शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती असून, ते अतिशय मातब्बर व चाणाक्ष असे राजकीय नेते आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रदीर्घकाळ काम केल्याने त्यांना पवारांच्या राजकीय खेळ्या माहिती आहेत. त्यामुळेच ते अजित पवार गटात गेले असले तरी अजितदादांच्या फार जवळ जाणे त्यांनी टाळले आहे. अजितदादांच्या पहिल्या बंडातदेखील डॉ. शिंगणे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहणे पसंत केले होते. त्यामुळे आतादेखील डॉ. शिंगणे हे शरद पवारांशी जवळीक साधून असून, परतीचे दरवाजे ठोठावत असल्याचे खात्रीशीर सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे जोपर्यंत या मतदारसंघातील अधिकृत उमेदवार शरद पवार हे जाहीर करत नाहीत, तोपर्यंत या मतदारसंघात काहीही राजकीय चमत्कार घडू शकतो, असेही राजकीय अभ्यासकांचे मत आहे.