पीकविमा जमा न झाल्यास विमा कंपनीचे कार्यालय फोडणार!
- तात्पुरत्या जामिनावर बाहेर आलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी ठणकावले!
– आम्ही हक्काचा पीकविमा मांगतो तर गुन्हा; पीकविमा न देऊन शेतकर्यांना फसविणार्या कंपनीला मात्र मोकळे रान; शर्वरीताई तुपकरांनीही पोलिसांना फटकारले!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आजपासून पीकविमा जमा करण्याचा शब्द पीकविमा कंपनीने दिला आहे. कंपनीने जर आज शेतकर्यांच्या हक्काची रक्कम जमा केली नाही तर पीकविमा कंपनीचे कार्यालय जागेवर सोडणार नाही, अशा शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीकविमा हडप करण्यास निघालेल्या पीकविमा कंपनीला ठणकावले. रात्री उशिरा तुपकर यांना तात्पुरता जामीन मंजूर झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तर आम्ही हक्काचा पीकविमा मागतो म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल करता. मग शेतकर्यांना पीकविमा न देणार्या व शेतकर्यांची फसवणूक करणार्या कंपनीवर गुन्हा दाखल करणार का? असा संतप्त सवाल अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी करत, पोलिसांना चांगलेच फटकारले.
शेतकर्यांच्या पीकविम्याच्या प्रश्नावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. गुरुवारी (दि.२६) गादी आणि उशी घेऊन ते बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. जोपर्यंत पीकविम्याचे शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही, तोपर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक कक्षात मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे तुपकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या तक्रारीवरून तुपकरांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा भारतीय न्यायसंहिता १३२ कलमांंतर्गत (जुना ३५३) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्यरात्रीनंतर तात्पुरत्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.
यावेळी तुपकर म्हणाले, की आजपासून पीकविमा जमा करण्याचा शब्द कंपनीने दिला आहे, जर आज शेतकर्यांच्या खात्यावर पीकविमा जमा झाला नाही तर पीकविमा कंपनीचे कार्यालय जागेवर ठेवणार नाही. मला गोळ्या घातल्या तरी शेतकर्यांसाठी लढत राहणार असून, सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करतो, असेही तुपकर म्हणाले. तर शेतकर्यांच्या हक्काचा पीकविमा मागणार्या रविकांत तुपकरांवर गुन्हा दाखल करता. मग शेतकर्यांची फसवणूक करणार्या कंपनीवर गुन्हा दाखल का करत नाही, असा खडा सवाल करत अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी पोलिसांना चांगलेच फटकारले. शेतकर्यांनी गावागावात आंदोलन सुरू करा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. तसेच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाबाहेरदेखील निदर्शने करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी या कार्यालयाला कडक बंदोबस्त पुरविला होता.
———–
https://x.com/i/status/1839336315885859289