Head linesNAGARPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

जयंत पाटलांनी केले प्रतापकाका ढाकणेंना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन!

- नातेवाईकांना टोलावले; प्रतापकाकंना खंबीर साद देण्याची शेवगाव-पाथर्डीकरांना घातली साद!

– राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारने राज्य दिवाळखोरीत काढल्याचा पाटलांचा आरोप

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – राज्यात शरदचंद्र पवार नावामुळे तुतारीची मोठी लाट निर्माण असल्याने सामान्य माणसं यंदा निवडून येणार असून, प्रतापकाका ढाकणे आमदार होऊन विधानसभेत जातील, पण त्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केले. शेवगाव येथे राष्ट्रवादीच्या शिवराज्य यात्रेचे आगमन झाले असता, ते बोलत होते. जयंत पाटील हे माजी आमदार तथा अजित पवार गटाचे नेते चंद्रशेखर व नरेंद्र घुले पाटलांचे नातेवाईक आहेत. तरीदेखील आपल्या सोयर्‍यांना टोलावून पाटलांनी प्रतापकाकांच्या विजयाचे आवाहन शेवगाव-पाथर्डीकरांना केल्याने राजकीय वर्तुळातून त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल कौतुक केले जात होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, की राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला. मात्र योजनाचा सुकाळ सुरू असून, ८ लाख कोटी रुपयाचे राज्यावर कर्ज असताना पुन्हा १२५ कोटीची मागणी करून राज्य दिवाळखोरीत काढले आहे. राज्यातील हे भ्रष्ट व शेतकरीविरोधी सरकार नेस्तनाबूत करण्यासाठी एक संघ व्हावे, सरकार लोकसभेच्या निकालामुळे घाबरलेले असून, आता तिजोरीचे दार काढून ठेवले आहे. राज्यात शासनाच्या खर्चातून एका कार्यक्रमावर ५ ते ७ कोटी रुपयाची उधळपट्टी जोरात सुरू आहे. पण महाराष्ट्र राज्य वास्तव परिस्थितीला तोंड देणारे राज्य आहे. राज्यात मोठे प्रकल्प आणले असा आव आणले जातात, पण ठोस कामे नाहीत. कामाची घोषणा करून टेंडर मंजूर करून फक्त १० टक्के बिल दिले जातात, नंतर निधीअभावी कामे बंद पडली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, आता कामे करूनही ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले अडकल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तसेच सामाजिक, दलित, आदिवासी यांच्या कल्याणकारी योजनेचा निधी इतरत्र वळविला आहे. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली गेली आहे. महिला, बालक सुरक्षित नाहीत. शासन अपयशी ठरल्याने राज्य अस्वस्थ बनले आहे. आता भ्रष्ट सरकार बदलाची भूमिका जनतेनी घेतली आहे आणि लोक वाट पाहत आहेत. राज्य सरकार शेतकरीविरोधी असून, वातावरण बदलले आहे. भ्रष्ट सरकार बदलावे लागेल. राज्यात सत्ता दिली तर केंद्रातील सरकार काही महिन्यात कोसळणार आहे, असा दावादेखील जयंत पाटील यांनी केला आहे. शेवगाव शहरात १५ दिवस पाणी मिळत नाही ही अत्यंत शरमेची बाब आहे. ताजनापुर प्रकल्प रखडला, शेतकर्‍यांना भरीव पीक विमा मिळाला नाही. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी याप्रसंगी केला.

प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील नात्यागोत्यमुळे येणार नाहीत अशी जोरदार चर्चा होती. सदर कार्यक्रम दुपारी दोनचा होता. परंतु सायंकाळी ७ वाजता प्रमुख पाहुणे व्यासपीठावर येवून चर्चेला पूर्ण विराम मिळाला. मात्र तब्बल सहा तास जनतेला ताटकळत बसावे लागले होते.

यावेळी खा. अमोल कोल्हे, खा. नीलेश लंके, माजी आ. संजय वाघचौरे, दिनकर पालवे, वसंत खेडकर, शिवसेना नेते भारत लोहकरे, हुमय अत्तार, बद्री बर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसले, रामराव चव्हाण, गायकवाड, योगिता राजळे, शंकर काटे, विद्यार्थी आघाडीचे सुनील गव्हाणे, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, गहिनीनाथ सिरसाठ, महिला आघाडीच्या विद्या गाडेकर, अमोल फडके, बंडू बोरुडे, अथर खान, नशिर शेख, शिवशंकर राजळे, माजी आ. संजय वाघचौरे, राज्य विद्यार्थी आघाडीचे गणेश गव्हाणे, यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्रताप ढाकणे यांनी केले. कार्यक्रमास माधव काटे, राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष गाहिनीनाथ थोरे पाटील, प्रकाश घनवट, शहादेव पातकळ, एकनाथ कुसाळकर, माजी जि प सदस्या प्रभावती ढाकणे, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र झरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, शेवगावचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे, शहराध्यक्ष बाळासाहेब डाके, तालुका उपाध्यक्ष सुभाष लांडे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शेवगावचे माजी सरपंच एजाज काजी, पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष नजीर भाई शेख, देवा पवार, योगेश रासने, संपत मगर, अशोकराव गायकवाड, श्रीकांत धुमाळ, सविता भापकर, आरती निर्‍हाळी यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. आभार राष्ट्रवादीचे तालुकध्यक्ष हरीश भारदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!