Breaking newsBULDHANAHead linesVidharbha

परतीच्या पावसाचा २,२५६ हेक्टरवरील पिकांना दणका!

- जिल्ह्यात अतिवृष्टी; सोयाबीन, कपाशी, मका पिकांची नासाडी; हतबल शेतकर्‍यांकडून नुकसान भरपाईची मागणी

– मागील भरपाईसाठी शासनाकडून तारीख पे तारीख!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – या महिन्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे व जमीन खरडून गेल्याने शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले होते. ही जखम ओली असतानाच, आता परत जाता जाता पावसाने जिल्ह्याला पुन्हा दणका दिला असून, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. यामुळे कपाशी, सोयाबीन, मका, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. २,२५६ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा आकडा कृषी विभागाचा असला तरी यापेक्षा जास्तच नुकसान झालेले आहे. पाऊस शेतकर्‍यांचा पिच्छा सोडायला तयार नसल्याने शेतकरी मात्र हतबल असून, शासकीय मदतीची अपेक्षा धरून बसला आहे. असे असताना या अगोदर झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही मिळाली नसून, शासनाकडून नुसती तारीख पे तारीख दिल्या जात असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. सततच्या पावसाचा कपाशीलाही फटका बसला. बोंडं खराब होत चालले आहेत. फुलपात्याही गळून पडत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. उडीद, भुईमूग, भाजीपाला पिकेही सडू लागली आहेत.

soyabean cropया महिन्याच्या सुरूवातीला म्हणजे २ व ३ सप्टेंबररोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे जवळजवळ १२ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीनसुद्धा खरडून गेली. ती जखम ओली असतानाच दि. २५ व २६ सप्टेंबरला पुन्हा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे २,२५६ हेक्टरवरील विशेषता कापूस, सोयाबीन, मका या पिकांचे नुकसान झाले. यामध्ये मोताळा तालुक्यातील ८ बाधीत गावातील ९१८ शेतकर्‍यांचे १०९५ हेक्टर, खामगाव तालुक्यातील ६ बाधीत गावातील १०७ शेतकर्‍यांचे ९१ हेक्टर व लोणार तालुक्यातील १४ बाधीत गावातील २३८० शेतकर्‍यांचे १०७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अर्थात कृषी विभागाचा हा नुकसानीचा प्राथमिक अंदाजीत अहवाल असून, यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्ह्यातील मेहकर, चिखलीसह इतरही तालुक्याला पावसाचा फटका बसला असून, सोंगलेली सोयाबीन पाण्यात बुडाली आहे. हातचे पीक डोळ्या देखत हातून जात असल्याचे पाहून शेतकरी मात्र चिंताग्रस्त दिसत असून, शासनाकडून मदतीची आस लावून बसला आहे. असे असताना या अगोदर झालेल्या नुकसानीची मदत शासनाकडून अद्याप मिळाली नसून, शेतकर्‍यांना नुसती तारीख पे तारीख देऊन बोळवण केली जात असल्याने संतापदेखील व्यक्त केला जात आहे.


खरीप हंगामात कर्जबाजारी होत शेतकऱ्यांनी नगदी पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी केली. पावसाने साथ दिल्याने पीकही बहरले. शेंगा लागल्यानंतर येलो मोझॅकने आक्रमण केले. यातून मार्ग काढत पीक वाचविले. सोंगणी सुरू केली. अनेक ठिकाणी पीक सोंगून ठेवण्यात आले. यापूर्वीच मुसळधार पावसाचा तडाखा बसला. शेतात पाणी साचल्याने रचून ठेवलेल्या सूड्या पाण्याखाली गेल्या. या पिकाला अंकुर फुटणे किंवा सडण्याचा धोका व्यक्त होत आहे. लोणार तालुक्यातील दाभा, पहूर, वढव व हिरडव या भागात नुकसानीची तीव्रता अधिक आहे. खामगाव, चिखली, मोताळा, बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजासह अन्य भागात नुकसान झाले आहे. सोयाबीन निघाल्यानंतर आर्थिक घडी व्यवस्थित बसवू, या विचारात असलेल्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर परतीच्या पावसाने पाणी फेरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!