कर्जत (प्रतिनिधी) : इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या आयएसीसी राष्ट्रीय प्रतिनिधि मंडळ २०२२ या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळामध्ये कर्जतच्या राजेंद्र गांगर्डे यांचा सहभाग असून, त्यांंच्या सहभागाचे परिवारासह, मित्रमंडळ व कर्जतकरांंनी त्यांंचे अभिनंदन केले आहे. द्विपक्षीय हितसंबंध वाढवत उद्योगांना चालना मिळण्यासाठी भारतातून एक प्रतिनिधी मंडळ गेले असून, मियामी, वॅाशिंग्टन, न्युयॅार्क, अटलांटा इ. शहरांमध्ये विविध उद्योजक, प्रशासकिय अधिकारी, सिनेट मेंबर्स, प्रसिद्ध उद्योजक व गुंतवणुकदार, विविध ट्रेड संघटना यांच्या बरोबर चर्चासत्र करत व भेटीगाठी घेणार आहे.
अमेरिकेतील भारतीय राजदुत तसेच अमेरिकेचे आजी/ माजी राजदुत यांच्याशीही या प्रतिनिधी मंडळाचे चर्चासत्र आयोजीत होणार असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते या प्रतिनिधि मंडळात सहभागी आहेत. ३१ ऑक्टो ते २ नोव्हे दरम्यान मियामी फ्लोरिडा, ३ व ४ नोव्हे रोजी न्यूयॉर्क तर ६ व ७ नोव्हे रोजी अटलांटा जॉर्जिया येथे हे प्रतिनिधि मंडळ भेट देणार आहे. यामध्ये कर्जतकर असलेले राजेंद्र गांगर्डेचा सहभाग आहे, बरीच वर्षे अमेरीकेसह इंग्लंड मध्ये राहूनही, आपल्या मायभूमी वर प्रचंड प्रेम, अभिमान व आदर असलेला, व त्यामुळे आपला व्यवसाय भारतामध्ये चालू करून विश्वगुरू इन्फोटेक प्रा. ली. या आपल्या स्वाफ्टवेअर कंपनीसाठी त्यांनी विशेष मेहनत घेत त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांसह आपले विश्व उभारले आहे. त्यांंच्या निवडीने परिवार, नातेवाईक, मित्रमंडळ व सर्वच कर्जतकरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून, त्यांंच्या ज्ञानाचा कर्जत मधील नवउद्योजकांना नक्कीच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या प्रतिनिधी मंडळाच्या उपस्थितीत अतुलनिय कामगीरी केलेल्या उद्योजकांना इंडो अमेरिकन लीडर शिप अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय नव उद्योजकांना अमेरिकेत ऑफिस सुरु करण्यासाठी प्राथमिक मार्गदर्शन तसेच गुंतवणुकदार व विविध अमेरिकन उद्योगपतींशी भेटी व चर्चासत्र ही आयोजीत केले जाणार असल्याची माहिती गांगर्डे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिली.